संरक्षण मंत्रालय

8 वा सशस्त्र दल माजी सैनिक दिन: देशभरात अनेक ठिकाणी पुष्पांजली  अर्पण समारंभ आणि माजी सैनिक रॅलींचे  आयोजन 


संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत  कानपूरमध्ये झालेल्या मेळाव्यात 1,000  माजी सैनिक  उपस्थित    

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध: राजनाथ सिंह

Posted On: 14 JAN 2024 1:28PM by PIB Mumbai

 

माजी सैनिकांच्या निःस्वार्थ कर्तव्य आणि बलिदानाच्या सन्मानार्थ  आणि या शूरवीरांच्या पुढच्या पिढीच्या नातेवाईकांसमवेत अधिक दृढतेसाठी  14 जानेवारी 2024 रोजी 8 वा सशस्त्र दल माजी सैनिक दिन देशभरात अनेक ठिकाणी साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून श्रीनगर, पठाणकोट, दिल्ली, कानपूर, अलवर, जोधपूर, गुवाहाटी, मुंबई, सिकंदराबाद, कोची आणि इतर अनेक ठिकाणी पुष्पांजली अर्पण समारंभ आणि  माजी सैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दल  स्टेशन, कानपूर येथे  माजी सैनिकांच्या  रॅलीला संबोधित करून या मेळाव्याचे  नेतृत्व केले. या मेळाव्याला सुमारे एक हजार माजी सैनिक उपस्थित होते. संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि मातृभूमीसाठी केलेल्या नि:स्वार्थ सेवेबद्दल वीरांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात  माजी सैनिकांचे विशेष स्थान आहे यावर त्यांनी भर दिला.

राजनाथ सिंह यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अतूट वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की,"वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यापासून ते आरोग्य सेवा आणि पुनर्रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच  माजी सैनिकांचे   कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे." ते पुढे म्हणाले की,  "देशाची प्रगती होत असताना तसेच सरकार अधिकाधिक प्रयत्न करत असताना, सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना आपले कुटुंब मानून सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची काळजी घेणे ही जनतेची सामूहिक जबाबदारी आहे. सेवानिवृत्त तसेच सेवारत सैनिकांचा सन्मान करण्याची इच्छाशक्ती अधिक दृढ करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

भारतीय सैनिकांचे शौर्य, सचोटी, कार्याविषयी समर्पण आणि मानवता केवळ संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आदरणीय आहे आणि संपूर्ण जगभरात ओळखली जात असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

या प्रसंगी, त्यांनी युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली  आणि वीरांना त्यांच्या सर्वोच्च बलिदान आणि समर्पित सेवेबद्दल आदरांजली वाहिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मेंटेनन्स कमांड एअर मार्शल विभास पांडे आणि एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन, कानपूर एअर कमोडोर एमके प्रवीण आदी मान्यवर उपस्थित होते.

1953 मध्ये या दिवशी सेवानिवृत्त झालेल्या सशस्त्र दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ  दरवर्षी 14 जानेवारी रोजी सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 2016 मध्ये साजरा करण्यात आला होता. माजी सैनिकांच्या सन्मानार्थ अशा संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1996025) Visitor Counter : 188


Read this release in: English , Hindi , Tamil , Urdu