युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवक विकसित भारताचे स्वप्न घेऊन पुढे जातील – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठीची नाशिक सज्ज, 12 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
नाशिकमधील 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर, केंंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतला तयारीचा आढावा
Posted On:
11 JAN 2024 10:19PM by PIB Mumbai
नाशिक, 11 जानेवारी 2024
स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून 12 ते 16 जानेवारी 2024 दरम्यान नाशिक येथे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून देशभरातील हजारो युवक यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण तसेच माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार, महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण सचिव मीता राजीवलोचन, महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा महोत्सवाच्या वेळापत्रकानुसार याचे उद्घाटन गुरुवारी 12 जानेवारी रोजी नाशिकमधील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. तत्पूर्वी, महोत्साच्या उद्घाटनाआधी पंतप्रधान मोंदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.
SS9P.jpeg)
याबाबत माध्यमांना संबोधित करताना अनुराग ठाकूर म्हणाले की नाशिकमध्ये युवा महोत्सवाचे आयोजन करत असताना अतिशय आनंद होत आहे. यंदाच्या महोत्सवात देशभरातील हजारो युवा सहभाग नोंदवणार असून एक लाखापेक्षाही जास्त प्रेक्षक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

'युवकांद्वारा, युवकांसाठी' अशी या महोत्सवाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयानुसार 2047 साली भारताला विकसित देश बनवण्याचे आपले सर्वांचे लक्ष्य आहे. नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवक विकसित भारताचे स्वप्न घेऊन पुढे जातील, असा विश्वास यावेळी अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे वेळापत्रक
* 12 ते 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता युवा कला महोत्सव महायुवा ग्राम, हनुमान नगर येथे सुरू होईल.
* 12 ते 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता खाद्य महोत्सव, महा युवा ग्राम हनुमान नगर येथे सुरू होईल.
* 12 ते 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र युवा प्रदर्शन, महायुवा ग्राम हनुमान नगर येथे सुरू होईल.
* 12 ते 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम महायुवा ग्राम हनुमान नगर येथे सुरू होईल.
* 13 ते 15 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता समूह आणि सोलो लोकनृत्य प्रदर्शन, महाकवी कालिदास कलामंदिर येथे होईल.
* 13 ते 15 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 वाजता फोटोग्राफी स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिर हॉल नं. 1 येथे होईल.
* 13 ते 15 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 वाजता महाकवी कालिदास कलामंदिर हॉल क्रमांक दोनमध्ये उद्घाटन आणि प्रस्तुतीकरण होईल.
* 13 ते 15 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये गट आणि सोलो लोकगीत प्रदर्शने होईल.
* 13 ते 15 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 वाजता गंगापूर रोडवरील उदोजी महाराज संग्रहालयात युवा कला शिबिर, पोस्टर मेकिंग आणि कथा लेखन होईल.
* 13 ते 14 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.15 वाजता प्रेरणादायक (सुविचार) कार्यक्रम, महा युवा ग्राम हनुमाननगरमध्ये आयोजित होईल.
* 13 ते 15 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता साहसिक कार्यक्रम अंजनेरी, बोट क्लब, चांभार लेणी आणि महायुवा ग्राम हनुमान नगरमध्ये होईल.
* 13 ते 15 जानेवारी रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजता स्वदेशी खेळ महायुवा ग्राम हनुमान नगरमध्ये होईल.
* 15 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.15 वाजता युवा संमेलन महायुवा ग्राम हनुमान नगरमध्ये होईल.
राष्ट्रीय युवा महोत्सव 16 जानेवारीला विभागीय क्रीडा संग्रहालयात एक समारोप समारंभाने समाप्त होईल.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर घेतला महोत्सवाच्या तयारीचा आढावा
नाशिकमध्ये आयोजित 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवार, 11 जानेवारी रोजी केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण तसेच माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.
आज सकाळी मुंबईतील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर अनुराग ठाकूर सायंकाळी चारच्या सुमारास रस्तेमार्गे नाशिकमध्ये दाखल झाले.
सर्वप्रथम नाशिकच्या तपोवन मैदान या कार्यक्रमस्थळाला भेट देऊन येथे सुरु असलेल्या तयारीचा ठाकूर यांनी आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही ठाकूर यांनी केल्या.
यानंतर अनुराग ठाकूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा केली. पुढे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच रामकुंड येथे सुरू असलेल्या तयारीचीही त्यांनी पाहणी केली.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर केले. अखेरीस, अनुराग ठाकूर यांनी हनुमान नगर येथील महायुवा ग्राम येथे भेट देत सर्व संबंधितांना महोत्सवासंदर्भात मार्गदर्शन केले.
27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव
दरवर्षी 12 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो.12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आहे. यंदाच्या महोत्सवाचे यजमानपद महाराष्ट्र भूषवित आहे. विकसित भारत: @2047,युवा के लिए, युवाओं के द्वारा(Viksit Bharat@2047)ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे.
HPT8.jpeg)

भारतातील विविध प्रदेशातील तरुण त्यांचे अनुभव सामायिक करू शकतील आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेने एकसंघ राष्ट्राचा पाया मजबूत करू शकतील, या भूमिकेतून राष्ट्रीय युवा महोत्सव हा मंच तयार करण्यात आला आहे.
नाशिक येथील महोत्सवात देशभरातून सुमारे 7500 युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, देशी खेळ, आणि विविध विषयांवर आधारित सादरीकरण, युवा कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग, कथा लेखन, युवा संमेलन, खाद्य महोत्सव इत्यादींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येणार आहे.
HA/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1995378)
Visitor Counter : 196