वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नव्या वर्षातील पहिल्या आणि भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रत्ने आणि आभूषण व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted On: 04 JAN 2024 6:38PM by PIB Mumbai

मुंबई, 4 जानेवारी 2024

 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या वैविध्यपूर्ण घटक आणि सामग्रीचा समावेश असलेल्या समग्र परिसंस्थेसह भारत, रत्ने आणि आभूषण उद्योगाचे जागतिक केंद्र बनू शकतो”, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नव्या वर्षातील पहिल्या आणि भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रत्ने आणि आभूषण व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुंबईत झाले, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांसह नवी मुंबईमधील 20 एकर क्षेत्रावर  इंडिया ज्वेलरी पार्क आणि सीप्झ, मुंबईतील सामाईक सुविधा केंद्र यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी सांगितले.

पायाभूत सुविधांना चालना दिल्यामुळे, रत्ने आणि आभूषण क्षेत्रात, अतिशय आधुनिक आणि कार्यक्षम वातावरणात जागतिक स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी एमएसएमईंचे सक्षमीकरण होणार आहे, असे ते म्हणाले. दुबईत भारत-यूएई सीईपीएच्या यशानंतर आम्ही विविध देशांमध्ये विस्तारलेल्या जागतिक बाजारपेठेत आमचा प्रवेश करण्यासाठी हाँगकाँगमध्ये नवी निर्यात प्रोत्साहन परिषद सुरू करण्याच्या विचारात आहोत, असेही त्यांनी नमूद केले. ज्वेलरी डिझाईन हे आमचे यापुढील मोठ्या निर्यातीचे क्षेत्र असेल, असे सांगत गोयल म्हणाले की फॅशन आणि ज्वेलरीसाठी आगामी काळात भारत हे संपूर्ण जगाचे आकर्षण केंद्र राहील.

भारताला फॅशन आणि आभूषणांच्या विश्वातील वैविध्यपूर्ण रचनांचे जागतिक केंद्र बनवण्यावर भर असला पाहिजे. फॅशन आणि आभूषणे यांच्या संचामुळे भारत जगासाठी एक मान्यताप्राप्त आणि पसंतीचे विवाह पर्यटन स्थळ बनू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आयआयजेएस सिग्नेचर 2024 च्या उद्घाटना दरम्यान, सॉलिटेयर इंटरनॅशनलच्या आयआयजेएस सिग्नेचर विशेष आवृत्तीचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आज इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रधान उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), जॉय अलुकासचे अध्यक्ष  जॉय अलुकास, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष किरीट भन्साली, जीजेईपीसीच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचे निमंत्रक नीरव भन्साली आणि जीजेईपीसी सीओएचे सहकारी, सव्यसाची रे(ईडी, जीजेईपीसी), सरकारी अधिकारी, मान्यवर, अभ्यागत, प्रदर्शक, खरेदीदार, व्यापार प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रत्ने आणि आभूषणे निर्यात परिषद (GJEPC) या देशातीलव सर्वात मोठ्या व्यापार मंडळाकडून आयआयजेएस सिग्नेचर जेम अँड ज्वेलरी व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जीजेईपीसीच्या 16व्या आयआयजेएस सिग्नेचरमध्ये 60 देश आणि 800 भारतीय शहरांमधून आंतरराष्ट्रीय ग्राहकांसह 32 हजारपेक्षा जास्त अभ्यागत सहभागी होतील आणि ते 1.25 लाख चौरस मीटर प्रदर्शन क्षेत्रात असलेल्या 3000+स्टॉल्सवरील 1500+ प्रदर्शकांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.

 

* * *

PIB Mumbai | JPS/S.Tupe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1993189) Visitor Counter : 100


Read this release in: English