अंतराळ विभाग

भारताची पहिली सौर मोहीम आदित्य-एल 1, पुढील महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॅग्रेंज पॉईंट 1 या त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचेल - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 18 DEC 2023 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

 

भारताची पहिली सौर मोहीम "आदित्य-एल 1" पुढील महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच साधारणपणे जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात लॅग्रेंज पॉईंट 1 या त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचेल असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.

दरम्यान, इस्रो पुढील वर्षभरात भारताच्या गगनयान या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेशी संबंधित विविध चाचण्या करेल असे ते म्हणाले.

अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे संसद टीव्हीला  दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसामुळे आणि दृढनिश्चयामुळे हे शक्य झाले आहे, ज्यांनी भूतकाळातील निर्बंध मोडून काढले आणि सक्षम वातावरण पुरवत भारताचे अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केले. परिणामी स्टार्टअप्स आणि उद्योगांकडून अभूतपूर्व  प्रतिसाद मिळत आहे.

अंतराळ तंत्रज्ञान खुले झाल्यामुळे देशातील सामान्य जनता चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1  सारख्या मोठ्या अंतराळ कार्यक्रमांचे  प्रक्षेपण पाहू शकली असे सिंह म्हणाले.  10,000 हून अधिक लोक आदित्य यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी आले होते आणि चांद्रयान-3 प्रक्षेपणाच्या वेळी सुमारे 1,000 माध्यम प्रतिनिधी हजर होते.

“चार वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्रात केवळ एक स्टार्टअप होते, मात्र आता हे क्षेत्र खुले केल्यानंतर आपल्याकडे जवळपास 190 खाजगी स्पेस स्टार्टअप्स आहेत आणि त्यातील पूर्वीचे आता उद्योजक बनले आहेत,” असे ते म्हणाले.

 भारतीय अंतराळ कार्यक्रम जरी उशिरा सुरू झाला, मात्र  आज जग चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरलेल्या चांद्रयान-3 अभ्यासाची आतुरतेने वाट पाहत आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

भारत पायाभूत सुविधा विकास, 'स्वामित्व' जीपीएस लँड-मॅपिंग, स्मार्ट सिटीज सारख्या बहुतेक सर्वच क्षेत्रात स्पेस अॅप्लिकेशन्सचा वापर करत आहे असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

“अंतराळ संशोधन आता प्रत्येकाच्या जीवनाला कुठल्या ना कुठल्या  प्रकारे स्पर्श करत आहे,” असे सांगून ते म्हणाले की अणुऊर्जेचा वापर आज स्वच्छ ऊर्जा आणि अन्न संरक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात केला जात आहे.

“परदेशात स्थलांतरित झालेले अंतराळ संशोधनातील तज्ज्ञ मायदेशी परत येत आहेत आणि स्टार्टअप सुरू करत आहेत.”असे सिंह म्हणाले.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987973) Visitor Counter : 73


Read this release in: English , Urdu , Hindi