आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मासिक पाळीविषयक स्वच्छता सुविधांच्या उप्लब्धतेबद्दल ताजी माहिती


वय वर्षे 10-19 या गटातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयक स्वच्छतेला चालना देण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय 'मासिक पाळीविषयक स्वच्छता प्रोत्साहन योजना' राबवते

Posted On: 15 DEC 2023 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2023

 

वय वर्षे 10-19 या गटातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयक स्वच्छतेला चालना देण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय 'मासिक पाळीविषयक स्वच्छता प्रोत्साहन योजना' राबवते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रम अंमलबजावणी योजना (पीआयपी) या शीर्षकाखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून आलेल्या प्रस्तावानुसार यासाठी निधी मंजूर करण्यात येतो. या योजनेची मुख्य उद्दिष्टे म्हणजे- किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयक स्वच्छतेसंबंधी जागरूकता वाढवणे, गुणवत्तापूर्ण सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता आणि किशोरवयीन मुलींकडून होणार त्यांचा वापर वाढवणे, आणि सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणस्नेही पद्धतीने सुरक्षित विल्हेवाट लागेल याची खबरदारी घेणे.

या क्षेत्रातील सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने मासिक पाळीविषयक स्वच्छता धोरणाचा मसुदा बनवला आहे. मासिक पाळीच्या संपूर्ण प्रवासादरम्यान, पहिल्या ऋतुप्राप्तीपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत व्यक्तिपरत्वे विभिन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या गरजा ओळखून, सर्वंकष आधार/ पाठबळ देण्याची या मसुद्यात काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये वंचित आणि असुरक्षित (कोणत्याही अडचणीत सहज सापडणाऱ्या) सामाजिक समूहांना प्राधान्य देण्यावर, मासिक पाळीविषयक स्वच्छता संसाधनांची समानशील उपलब्धता असण्यावर आणि त्या समाजघटकांची विशिष्ट गरज भागवण्यावर या मसुद्यात भर दिलेला आहे. मासिक पाळी हा जीवनाचा नैसर्गिक आणि सर्वसामान्य भाग असल्याचे मान्य करणाऱ्या व त्या स्वच्छतेची महती जाणणाऱ्या समाजाची निर्मिती करणे, जागरूकता वाढवणे आणि जुनाट सामाजिक रूढींना आह्वान देणे- या प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी या धोरणाची मदत होणार आहे. मासिक पाळी येणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य, संपूर्ण स्वास्थ्य आणि सक्षमीकरण या संकल्पनांना चालना देणे- हे या धोरणाच्या मसुद्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी लोकसभेत आज दिलेल्या लेखी उत्तरात हे निवेदन दिले.

 

* * *

S.Kane/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986830)
Read this release in: English , Urdu , Hindi