विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सर्व सरकारी विभागांमधे, अगदी वैज्ञानिक विभाग आणि संस्थांमधेही हिन्दीचा वापर वाढला आहे – डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
15 DEC 2023 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
देशभरातील वैज्ञानिक विभाग आणि संस्थांसह सर्व सरकारी विभागांमध्ये हिंदी भाषेचा वापर वाढला असल्याचं, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं.
जगभरात हिंदीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीची लोकप्रियता वाढली आहे, असं त्यांनी अधोरेखित केलं.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त हिन्दी सल्लागार समितीची 34 वी बैठक आज डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रत्येक घरापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये विज्ञानविषयक लेखनाचे योग्य भाषांतर करणे महत्त्वाचे आहे, असंही डॉ. जितेंद्र सिंग पुढे म्हणाले.
विज्ञानाविषयक लेखनाचा, शब्दशः अनुवाद करण्यापेक्षा, आशय समर्पकतेनं पोहोचवण्यासाठी, लवचिकता आणि त्या त्या भाषेतील संदर्भ यांचा वापर व्हायला हवा, असंही डॉ. सिंह म्हणाले.

हिंदीच्या अधिकृत वापराला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी हिंदी सल्लागार समितीच्या सदस्यांशी नियमितपणे संपर्कात राहण्याचे निर्देश डॉ. जितेंद्र सिंग यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
समितीच्या सदस्यांनीही, या विभागांमधील हिंदीच्या कामकाजाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारी कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर वाढवण्यासाठी त्यांच्या मौल्यवान सूचनाही दिल्या.

भाषा लोकांना परस्परांशी जोडतात, त्यांची सक्तीने अंमलबजावणी केली नाही, तर त्या कधीही लोकांना एकमेकांपासून तोडत नाहीत, याकडे लक्ष वेधत डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, आपण सर्वांनी मातृभाषा आणि राजभाषा हिंदी या दोन्हींसाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत, त्याशिवाय आणखीही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जेव्हा भाषा नोकरी किंवा व्यवसायाशी जोडली जाते, तेव्हा तीच स्वतःचा विकासाचा मार्ग शोधते, असे निरीक्षण मंत्र्यांनी नोंदवले.
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1986818)