आदिवासी विकास मंत्रालय
ट्रायफेड तर्फे मडगाव येथे आदिवासी कारागीर एम्पॅनलमेंट मेळाव्याचे आयोजन
राज्याच्या पाच तालुक्यांतील गौडा, वेलीप, कुणबी जमातींमधील कारागिरांनी या मेळाव्यात घेतला भाग
Posted On:
14 DEC 2023 7:20PM by PIB Mumbai
गोवा, 14 डिसेंबर 2023
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने आज, 14 डिसेंबर 2023 रोजी, दक्षिण गोव्यात आदिवासी कारागीर एम्पॅनलमेंट मेळाव्याचे आयोजन केले. मडगाव येथील आदिवासी कल्याण विभागाच्या उपसंचालकांच्या कार्यालयात हा मेळावा भरवण्यात आला.
वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या आदिवासी समुदायांना या मेळाव्यात भाग घेण्यासाठी आणि त्यांची असामान्य कलाकुसर, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि उल्लेखनीय कौशल्ये सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गोव्यातील संग्वेम, काणकोण, क्यूपेम(केपे ), पोंडा आणि साष्टी या तालुक्यांमधील गौडा, वेलीप, कुणबी जमातीमधील 25 हून अधिक कारागिरांनी या मेळाव्यात भाग घेतला आणि त्यांची उत्पादने सादर केली. या कलाकारांनी हाताने बनवलेल्या वस्तू, हाती तयार केलेल्या तांदळाच्या शेवया, कुणबी साडी, गोव्याच्या पद्धतीची बॅग, सेंद्रिय पांढरा मुळा, इत्यादींसह अनेक वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या. एम्पॅनलमेंटनंतर या कारागीरांच्या उद्योजकतेला ट्रायफेडकडून मिळू शकणाऱ्या पाठबळाबाबत आयोजकांनी या कारागिरांना माहिती दिली. पाच स्वतंत्र कारागीर आणि तीन स्वयंसहाय्यता बचत गटांना या मेळाव्यात एम्पॅनल करून घेण्यात आले.
आदिवासी कल्याण विभागाच्या उपसंचालक स्वाती दळवी, ट्रायफेडचे उपव्यवस्थापक एस.पी.सुदलाई, केव्हीआयसीचे सहाय्यक संचालक प्रमोद आंबेडकर, आदिवासी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सागर वेर्लेकर तसेच आदिवासी कल्याण विभागाचे जिल्हा कल्याण अधिकारी अनुप शेणई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आदिवासी कारागिरांना त्यांचे हस्तकौशल्य सादर करण्यास आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योजकतेचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे हा या मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश होता. या मेळाव्याने प्रतिभावंत कलाकारांना एम्पॅनल करून घेण्यासाठी आणि त्यांच्या अत्युत्कृष्ट कारागिरीला ओळख मिळवून देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला. एम्पॅनलमेंट प्रक्रियेमुळे या आदिवासी कारागिरांना सातत्यपूर्ण पाठींबा, बाजारपेठेपर्यंत पोहोच तसेच हस्तकला क्षेत्रातील रचनाकार, निर्यातदार आणि भागधारक यांच्याशी सहयोगाच्या संधी सुलभतेने उपलब्ध होतात.
एम्पॅनलमेंटमुळे आदिवासी कारागिरांना भरीव प्रमाणात पाठबळ मिळते कारण एम्पॅनलमेंट झाल्यावर या कारागिरांना सुधारित रचना आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या अस्सल उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यात मदत होते. या प्रक्रियेत सहभागी झाल्यामुळे या कलाकारांना देशभरातील विविध महोत्सवांच्या माध्यमातून बाह्य बाजारपेठांमध्ये थेट पोहोच देखील उपलब्ध होते.
* * *
PIB Panaji | S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986424)
Visitor Counter : 76