अणुऊर्जा विभाग
अणुऊर्जा विभागाने तयार केलेल्या न्यूट्रास्युटिकल ‘ऍक्टोसाईट’ मुळे कर्करोग उपचारांमध्ये मोठे परिवर्तन घडणार
Posted On:
13 DEC 2023 9:10PM by PIB Mumbai
मुंबई, 13 डिसेंबर 2023
रेडियोथेरेपीचे उपचार घेणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्णांच्या जीवनात सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत अणुऊर्जा विभाग आणि मेसर्स आयडीआरएस लॅब्ज प्रा. लि. बंगळूरु यांनी ‘ऍक्टोसाईट’ टॅब्लेट्स विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. रेडियोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी करण्याच्या प्राथमिक उद्देशाने, मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्राचे तज्ञ, टाटा मेमोरियल रुग्णालय, नवी मुंबईचे कर्करोगविषयक संशोधन आणि शिक्षणाचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र यांनी आयडीआरएस लॅब्जसोबत सहकार्य केले आहे.
‘ऍक्टोसाईट’ टॅब्लेट्सनी उल्लेखनीय परिणाम दाखवले आहेत, विशेषतः पेल्व्हिक कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये रेडियोथेरेपीमुळे होणाऱ्या सिस्टायटीसमध्ये( लघवीमध्ये रक्त) याचा परिणाम दिसून आला आहे. ‘ऍक्टोसाईट’ टॅब्लेट्सचा वापर करून उपचार देण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा दिसून आली आहे, ज्यामुळे मूत्राशय शस्त्रक्रियेने काढून टाकण्याची गरज राहिली नाही. कर्करोगावरील रेडियोथेरेपीमध्ये सहाय्यक औषध म्हणून, पुनरुज्जीवनकारी पौष्टिक घटक, प्रतिकारक्षमता वर्धक आणि ऍन्टीऑक्सिडंट म्हणून तयार करण्यात आलेली ‘ऍक्टोसाईट’ टॅब्लेट कर्करोगावरील उपचारात एक महत्त्वाची सुधारणा दाखवत आहे.
‘ऍक्टोसाईट’ टॅब्लेटला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने(FSSAI) मान्यता दिली आहे. या नियामक मंजुरीमुळे ‘ऍक्टोसाईट’ या टॅब्लेटची सुरक्षा आणि अनुपालन यांवर भर दिला गेल्यामुळे आरोग्यनिगा क्षेत्रातील व्यावसायिक आणि रुग्ण या दोघांनाही तिची परिणामकारकता आणि दर्जा यांची हमी मिळाली आहे.
पेल्व्हिक कर्करोगग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीत उल्लेखनीय सुधारणा
रेडियोथेरेपी घेणाऱ्या पेल्व्हिक कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये ‘ऍक्टोसाईट’ या टॅब्लेटनी विलक्षण परिणामकारकता दाखवली आहे. या रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आणि शस्त्रक्रिया करण्याची गरज उरली नाही.
अनेक प्रकारे उपयोगीः ‘ऍक्टोसाईट’ ही टॅब्लेट केवळ एक पूरक घटकापेक्षा अधिक उद्देश साध्य करत आहे. कर्करोगावरील रेडियोथेरेपीमध्ये सहाय्यक औषध म्हणून, पुनरुज्जीवनकारी पौष्टिक घटक, प्रतिकारक्षमता वर्धक आणि ऍन्टीऑक्सिडंट म्हणून तयार करण्यात आलेली ‘ऍक्टोसाईट’ टॅब्लेट कर्करोगावरील उपचारात बहुउपयोगिता दाखवत आहे.
नियामक मंजुरीः ‘ऍक्टोसाईट’ टॅब्लेटला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने(FSSAI) दिलेल्या मान्यतेमुळे सुरक्षा आणि दर्जाच्या मानकांची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे, त्यामुळे आरोग्यनिगा क्षेत्रातील व्यावसायिक आणि रुग्णांना ‘ऍक्टोसाईट’च्या विश्वासार्हतेची हमी मिळाली आहे.
बाजारातील उपलब्धताः जानेवारी 2024 मध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता असलेली ‘ऍक्टोसाईट’ कर्करोग उपचारांच्या नियमावलीत एक परिवर्तनकारक घटक बनण्यासाठी सज्ज झाली आहे.
अणुऊर्जा विभाग आणि उद्योग यांच्यातील सहकार्य या क्रांतिकारक उपचाराला प्रत्यक्षात साकार करण्यात महत्त्वाचे ठरले आहे. ही नवीन घडामोड म्हणजे कर्करोगांवरील उपचारात शास्त्रीय नवोन्मेष आणि वास्तवातील उपाय यांचा मिलाफ घडवणारा एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.
अणुऊर्जा विभागाचे शास्त्रज्ञ आणि उद्योग यांच्यातील सहकार्याने कर्करोगग्रस्त रुग्णांच्या जीवनामानाच्या दर्जात सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986065)
Visitor Counter : 134