अर्थ मंत्रालय
अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीने ओलांडला सहा कोटींचा टप्पा
Posted On:
12 DEC 2023 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2023
केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत होणाऱ्या नोंदणीने, आज सहा कोटींचा टप्पा पार केला आहे, चालू आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत, 79 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेअंतर्गत, समाजातील सर्वात दुर्बल घटकांना निवृत्तीवेतनाच्या परिघात आणण्याचा सरकारचा प्रयत्न, बँकांच्या अथक परिश्रमांमुळे यशस्वी होत आहे.
अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना असून, 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा प्रारंभ केला आणि देशातील वयोवृद्ध नागरिकांना उत्पन्न सुरक्षा मिळण्याची व्यवस्था केली. विशेषतः गरीब, उपेक्षित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांवर या योजनेत भर देण्यात आला आहे.
निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) अलीकडच्या काळात या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यात हिंदी, इंग्रजी आणि 21 प्रादेशिक भाषांमध्ये या योजनेची माहिती देणारे, एका पानाचे पत्रक/हस्तपत्रक प्रकाशित करणे समाविष्ट आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत, ग्राहक तिहेरी लाभ मिळवण्यास पात्र ठरतो. त्यानुसार, 60 वर्षे वयानंतर, 1,000 ते 5,000, रुपये प्रती महिना रुपये निवृत्तीवेतन आजीवन मिळू शकेल. त्यांचे योगदान आणि योजनेचा लाभ घेतांना, त्यांचे वय यानुसार, निवृत्तीवेतनाचा आकडा बदलू शकतो. लाभार्थी सदस्याचा मृत्यू झाल्यास, निवृत्तीवेतन त्यांच्या जोडीदाराला दिले जाईल आणि सदस्य आणि जोडीदार दोघांच्या मृत्यूनंतर, सदस्यांच्या वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत जमा झालेली निवृत्तीवेतनाची संपत्ती त्यांनी नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल.
S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1985675)
Visitor Counter : 139