पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

पहिल्या टप्प्याच्या अखेरीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी लीड आयटी 2.0 च्या तीन स्तंभाची घोषणा केली

Posted On: 09 DEC 2023 4:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज उद्योगांतील स्थित्यंतरासाठीच्या नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्यातील (लीड आयटी 2.0) तीन स्तंभांची घोषणा केली.

संयुक्त अरब अमिरात येथील कॉप-28 मध्ये भारत आणि स्वीडन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या लीड आयटी शिखर परिषद 2023 मध्ये बोलताना आणि लीड आयटीचा पुढचा टप्पा जगासमोर आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांसमोर सादर करताना, केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की हा दुसरा टप्पा तीन स्तंभांच्या आधारे विकसित करण्यात आला आहे. हे स्तंभ खालीलप्रमाणे आहेत-

1. संवादासाठीचा जागतिक मंच

2. तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सह-विकसन

3. उद्योगांतील स्थित्यंतरांसाठीचा मंच

या कार्यक्रमाचे लक्ष्यीत उपक्रम आणि शाश्वततेप्रती अढळ निष्ठा यांच्या माध्यमातून लीड आयटी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर उद्योग क्षेत्रातील भागधारकांना सहभागी करून घेत आहे.

उद्योग स्थित्यंतर मंचाबाबत (आयटीपी) बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की हा मंच तंत्रज्ञान क्षेत्रात सह-विकसन, सादरीकरण तसेच अंमलबजावणीची संकल्पना मांडतो. त्याच वेळी, आयटीपी विविध मार्गांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली बहुपक्षीय तंत्रज्ञानविषयक तसेच आर्थिक मदत यांचा परिणामकारक पद्धतीने समन्वय साधतील.

अशाच प्रकारचा एक मंच भारत आणि स्वीडन या देशांदरम्यान विकसित करण्यात आला असून 1 डिसेंबर रोजी, दोन्ही देशांच्या नेत्यांच्या हस्ते या मंचाच्या कार्याची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय मंत्री यादव यांनी उपस्थितांना दिली. भारत आणि स्वीडन यांच्यात सखोल सहकारी संबंध विकसित करून संस्थात्मक रचना बळकट करण्याच्या उद्देशासह निर्माण करण्यात आलेला हा मंच कमी-कार्बन उत्सर्जनाच्या मार्गांना चालना देईल.

जागतिक सहकार्याप्रती वचनबद्धतेच्या भूमिकेवर भारत ठाम आहे याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की आपण हवामानविषयक पारदर्शक वित्तपुरवठा यंत्रणा, न्याय्य बाजारपेठ संरचना तसेच तफावत भरून काढण्यासाठी सोयीची जागतिक तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धत आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या हवामान तंत्रज्ञानांच्या मोठ्या प्रमाणातील वापरामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे.

त्याच वेळी, आपल्या औद्योगिक प्रणालींच्या चढत्या भाजणीला आकार देऊ शकणारे अभिनव संशोधक आणि गुंतवणूकदार असलेल्या उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची या परिवर्तनात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे, याचे स्मरण केंद्रीय मंत्री यादव यांनी उपस्थितांना करून दिले. उद्योग क्षेत्रातील स्थित्यंतराला पाठींबा आणि प्रोत्साहन देऊन, तसेच सहभागी करून घेऊन लीडआयटीची संकल्पना आणि मोहीम यांच्याप्रती सातत्यपूर्ण वचनबद्धतेसह हा उपक्रम चालवण्याचे प्रोत्साहन, यादव यांनी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना दिले.

स्वीडनच्या हवामान आणि पर्यावरण मंत्री रोमिना पौरमोख्तरी यांनी याप्रसंगी बोलताना, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या गरजेवर भर दिला.

***

M.Pange/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984644) Visitor Counter : 69


Read this release in: English , Hindi