इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जीपीएआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील जागतिक भागीदारी शिखर परिषद 2023 मध्ये एआय गेमचेंजर्स अवॉर्ड्स'चे आयोजन
Posted On:
09 DEC 2023 12:27PM by PIB Mumbai
ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जीपीएआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात जागतिक भागीदारी हा एक बहु-भागधारकांचा समावेश असणारा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संबंधित प्राधान्यक्रमांवर आधारित अत्याधुनिक संशोधन आणि उपयोजित उपक्रमांना समर्थन देऊन कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्यातील तफावत दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सुरुवातीला 15 सदस्यांसह जून 2020 मध्ये सुरू झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील या जागतिक भागीदारी (जीपीएआय) चे सदस्यत्व आज 28 सदस्य देशांमध्ये विस्तारले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जागतिक भागीदारीचा वर्ष 2020 मधील एक संस्थापक सदस्य म्हणून युरोपियन युनियन सध्या या भागीदारी परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असून 2024 या वर्षी या भागीदारी परिषदेचे मुख्य अध्यक्षपद भारत भूषवणार आहे, त्याच अनुषंगाने भारत आणि युरोपियन युनियन यांनी संयुक्तपणे 12 ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान भारतात ही जीपीएआय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे
कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित या जागतिक भागीदारी परिषदेमध्ये बहु-भागीदारी तज्ज्ञांचा समूह, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बहुपक्षीय संस्था आणि इतर संबंधित भागधारकांसह 26 भागीदार सदस्य देश आणि युरोपियन युनियन मधील वरिष्ठस्तरीय सरकारी शिष्टमंडळे सहभागी होतील. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जागतिक भागीदारीच्या वार्षिक परिषदेचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता) गेमचेंजर्स पुरस्काराचे आयोजन करत आहे. या प्रतिष्ठेच्या आयोजनांमधून विविध पार्श्वभूमी असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधित क्षेत्रातील उद्योजक आणि नवोन्मेषकांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल तसेच त्यांच्या नाविन्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला व्यासपीठ मिळवून देईल. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जागतिक भागीदारीच्या जागतिक आरोग्य, हवामानातील बदल, सुदृढ जनता अशा क्षेत्रांत सहकार्य आणि शाश्वत शेती या विषयासंबंधी प्राधान्यक्रमांना या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाईल.
12 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एआय गेमचेंजर्स अवॉर्डसाठी मागविण्यात आलेल्या निवेदनाला स्टार्टअप्स क्षेत्रातील विविध गटाकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सरकार, नागरिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील सदस्यांचा समावेश असलेल्या पुनरावलोकन समितीने, दाखल झालेल्या अर्जांचे बारकाईने मूल्यमापन केले. यावर सविस्तर चर्चा होऊन आणि स्टार्टअप्सनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपायांचे मूल्यांकन केल्यानंतर समितीने अंतिम 10 स्टार्टअप्सची निवड केली.
निवड झालेले अंतिम 10 स्टार्टअप्स जीपीएआयच्या वार्षिक शिखर परिषदे दरम्यान 14 डिसेंबर 2023 रोजी ठरल्याप्रमाणे होणाऱ्या एआय (AI) गेमचेंजर्स कार्यक्रमात आपल्या संशोधनाचे प्रदर्शन करतील. आपले तंत्रज्ञ, उद्योजक आणि स्टार्टअप्सना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे मार्गदर्शन करणे आणि त्यांचा गौरव करणे हा भारत सरकारच्या सातत्यपूर्ण समर्थनाचा एक भाग आहे.
***
M.Pange/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984437)
Visitor Counter : 81