पर्यटन मंत्रालय
दादर केटरिंग कॉलेजला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आनंदोत्सव; याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या संकेतस्थळाचा प्रारंभ
Posted On:
05 DEC 2023 5:38PM by PIB Mumbai
मुंबई, 5 डिसेंबर 2023
मुंबईतील दादर केटरिंग कॉलेजला (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 डिसेंबर 2023 रोजी एका गौरवशाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेचे माजी विद्यार्थी ॲनाबेल रॉड्रिग्स ( 1985 तुकडी ) आणि डॉ. नितीन शंकर नागराळे ( 1995 तुकडी ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दादर केटरिंग कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. आठवणींचा खजिना असलेले हे संकेतस्थळ देखील दादर केटरिंग कॉलेजच्या आजवरच्या वाटचालीचा उत्सव आहे. दादर केटरिंग कॉलेज हे आशियातील पहिले महाविद्यालय आहे ज्याने आदरातिथ्य अध्यापनाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत.
या कार्यक्रमादरम्यान "डेलीकेसीज ऑफ ख्रिसमस" या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी - शेफ व्ही के अय्यर (1980 तुकडी ), शेफ मनोज वसईकर (1985 तुकडी ) आणि शेफ शॅनन लॉरेन्स (2010 तुकडी) यांनी या पाककला स्पर्धेत परिक्षक म्हणून काम केले. शेरॉन डिसोझा यांना आपल्या पाककला कलात्मकतेसह स्पर्धेत प्रथम क्रमांक, मारिया गोम्स यांना स्वादिष्ट पाककृतीद्वारे द्वितीय क्रमांक तर श्रुती फाटक यांनी उल्लेखनीय सादरीकरणासाठी तिसरा क्रमांक पटकावला.
यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायन सादर केले आणि अनेक उत्साही नृत्याविष्कार सादर केले.
जमलेल्या सर्वांच्या आनंदासाठी कार्यक्रमस्थळी हस्तकला नमुने आणि ख्रिसमस मिठाईसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि पेये असलेले स्टॉल्स देखील लावण्यात आले होते.



N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1982763)
Visitor Counter : 67