संरक्षण मंत्रालय

पहिले सर्वेक्षण जहाज ‘संधायक’ भारतीय नौदलाकडे सुपूर्द

Posted On: 04 DEC 2023 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023


 

कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE), या जहाज बांधणी कारखान्यात बनवण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या चार सर्वे व्हेसल, अर्थात सर्वेक्षण नौकांपैकी  ‘संधायक’ (3025 यार्ड) हे पहिले(मोठे) सर्वेक्षण  जहाज  04 डिसेंबर 23 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. 30 ऑक्टोबर 18 रोजी चार (मोठ्या) सर्वेक्षण जहाजांसाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

एसव्हीएल (SVL) जहाजांची रचना आणि बांधणी मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE), कोलकाता द्वारे इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग क्लासिफिकेशन सोसायटीच्या नियमांनुसार करण्यात आली आहे.

बंदरांकडे पोहोचण्याचे विविध मार्ग निश्चित करण्यासाठी किनारपट्टी भाग आणि खोल-पाण्याचे व्यापक हायड्रोग्राफिक सर्वेक्षण आणि या मार्गांच्या दिशा ठरवणे, ही या जहाजाची प्राथमिक भूमिका असेल. जहाजाच्या कार्यक्षेत्रात ईईझेड/ उपखंडांच्या समुद्राखालील विस्तारित हद्दी पर्यंतचे क्षेत्र समाविष्ट आहे. ही जहाजे संरक्षण आणि नागरी वापरासाठी समुद्रशास्त्रीय आणि भूभौतिकीय डेटा (विदा) देखील गोळा करतील. आपल्या दुय्यम भूमिकेत, ही जहाजे मर्यादित संरक्षण प्रदान करतील आणि युद्ध / आणीबाणीच्या काळात रुग्णालय जहाज म्हणून कार्यरत राहतील. सुमारे 3400 टन वस्तुमानाचे आणि एकूण 110 मीटर लांबीचे ‘संधायक’ जहाज, डेटा गोळा करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी प्रणाली, पाण्याखालील स्वयंचलित वाहन, दूरवरून चालवता येणारे वाहन, डीजीपीएस लांब पल्ल्याचा वेध घेणारी प्रणाली, डिजिटल साइड स्कॅन सोनार इ. यासारख्या  अत्याधुनिक हायड्रोग्राफिक उपकरणांनी सुसज्ज आहे. दोन डिझेल इंजिनांवर चालणारे हे जहाज 18 नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्यासाठी सक्षम आहे.
12 मार्च 19 रोजी या जहाज बांधणीची पायाभरणी करण्यात आली, आणि 05 डिसेंबर 21 रोजी या जहाजाचे जलावतरण करण्यात आले. 04 डिसेंबर 23 रोजी भारतीय नौदलाकडे सुपुर्द होण्यापूर्वी, या जहाजाने विविध बंदरे आणि समुद्रात चाचण्यांचे सर्वसमावेशक टप्पे पार केले आहेत.

किमतीचा विचार केला तर संधायक जहाज 80% पेक्षा जास्त स्वदेशी आहे. भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले संधायक, हे भारत सरकार आणि भारतीय नौदलाने ‘आत्म निर्भर भारत’ अभियानाला दिलेल्या प्रेरणेची पुष्टी आहे. कोविड साथरोग आणि बांधकामा दरम्यान उद्भवलेल्या इतर भू-राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर झालेले संधायक जहाजाचे जलावतरण, हे हिंद महासागर क्षेत्रात देशाचे सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणातील हितधारक, एमएसएमई आणि भारतीय उद्योगांनी केलेल्या सहयोगी प्रयत्नांना अभिवादन आहे.

 

 
S.Patil/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 (Release ID: 1982484) Visitor Counter : 114


Read this release in: English , Urdu , Hindi