श्रम आणि रोजगार मंत्रालय
राष्ट्रीय रोजगार मेळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नियुक्तीपत्रांचे वितरण
अकराव्या रोजगार मेळ्याअंतर्गत महाराष्ट्रात 400 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यात उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान
Posted On:
30 NOV 2023 6:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 51,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी आयोजित आजच्या या अकराव्या रोजगार मेळ्यात एकूण 437 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. आजच्या या रोजगार मेळाव्यात नोकरीची नियुक्ती पत्र देण्यात आलेल्या विभागामध्ये केंद्रीय सीमा शुक्क विभाग, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सशस्त्र सेना दल, आय टी बीपी, केंद्रीय विद्यालय संगठन, भारतीय टपाल विभाग, बँक ऑफ इंडिया, आणि आरोग्य विभागांचा समावेश आहे.
नवनियुक्त सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी विकसित भारत बनवण्यासाठी विश्वासपूर्ण सेवा द्यावी असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न -नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात केले.
प्रत्येकाने दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला बदल दिसून येईल. आपण सर्वांनी देशहितासाठी कार्य केले तर देश निश्चितच आपल्या हाती सुरक्षित राहिल. आगामी काळात विकसित भारत होण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही असे गोयल म्हणाले.
आज मुंबईतल्या राँयल ऑपेरा हाऊस चर्नी रोड येथे आयोजित रोजगार मेळ्यात 86 युवक -युवतींना सरकारी सेवेतल्या नियुक्तीचे पत्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न -नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त पी के अग्रवाल, सीजीएसटीचे मुख्य आयुक्त एस एम टाटा उपस्थित होते.
एकुण 135 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून आज 86 जणांना प्रत्यक्ष तर 49 उमेदवारांना ई-मेलद्वारे नियुक्ती पत्रे देण्यात आली. या सर्व 135 उमेदवारांना केंद्रीय सीमा शुक्क विभाग, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सशस्त्र सेना दल, आय टी बीपी, केंद्रीय विद्यालय संगठन, भारतीय टपाल विभाग, बँक ऑफ इंडिया, आणि आरोग्य विभागात सेवेची संधी मिळाली आहे.
मुंबईतल्या बिर्ला मातोश्री सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त संजयकुमार उपस्थित होते.
लोकसंख्या अधिक असल्याने भारतात बेरोजगारीची समस्या आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 10 लाख रोजगार देण्याची घोषणा केली होती आणि आतापर्यंत झालेल्या 10 रोजगार मेळ्यात 7 लाखांहून अधिक जणांना रोजगार देण्यात आला. सरकार बेरोजगारीच्या प्रश्नावर काम करत आहे आणि सगळ्यांना घेऊन पुढे जात आहे असे असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले कि नोकरीबरोबर स्वयंरोजगारही महत्वाचा आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार स्टार्ट अप इंडिया आणि तत्सम योजनांद्वारे त्याला प्रोत्साहन देत आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 25 जणांना तर एकूण 78 जणांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
आज नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया -5, बँक ऑफ बडोदा-1, सीजीएचएस-1, डाक विभाग-17, आयआयटी मुंबई-2, आयकर विभाग-26, आर सी एफ -2, केंद्रीय विद्यालय-10, संरक्षण मंत्रालय- 4 अशा एकूण 78 जणांचा समावेश आहे.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात 143 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आगामी काळात सशक्त आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन यावेळी राणे यांनी केले.
नागपूर मध्ये राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी नागपूर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त जयंत दिद्दि, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आयकर विभाग, रेल्वे विभाग, निमलष्करी दल, एम्स, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था -ट्रिपल आयट , यासारख्या केंद्र शासनाच्या विभागांमध्ये 81 उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रधान आयकर आयुक्त जयंत दिद्दी यांनी नवनियुक्त उमेदवारांना शासन सेवेत निष्ठेने काम करण्याचे त्याचप्रमाणे प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन केले. आपल्या विभागाचे नाव उंचावेल अशी कामगिरी करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.
***
S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981242)
Visitor Counter : 129