माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 54 मध्ये पहिल्या लता मंगेशकर स्मृती संवादाचे आयोजन
शेखर कपूर आणि सुधीर मिश्रा यांनी 'मानवी सर्जनशीलता विरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर केली चर्चा
कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्चस्व असलेल्या जगात, कलाकार आणि तत्त्वज्ञांनी पुढाकार घ्यावा कारण गोंधळ हाताळण्यास ते सक्षम आहेत: शेखर कपूर
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2023
गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट निर्माते शेखर कपूर "मानवी सर्जनशीलता विरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता" या विषयावरील संवादात सहभागी झाले. या सत्राचे सूत्रसंचालन सुधीर मिश्रा यांनी केले. हा मास्टरक्लास इफ्फी आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या लता मंगेशकर स्मृती संवाद मालिकेचा भाग होता.
संवादाची सुरुवात करताना शेखर कपूर यांनी मानवी बुद्धिमत्तेच्या विशिष्ट गुणांवर भर दिला आणि लोकांना त्यांच्या हृदयातील बुद्धिमत्तेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. मानसिक बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्तेच्या महत्त्वावर भर देण्यासाठी त्यांनी बॉब डिलन यांचे वाक्य उद्धृत केले, "माझ्या सर्वोत्तम ओळी तितक्याच वेगाने लिहिल्या गेल्या जितक्या वेगाने माझ्या हाताने लिहिता येईल."
त्यांनी अंतर्ज्ञान, निवड आणि लहरीपणा सारखे घटक अधोरेखित करत कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेवर ताबा मिळवण्याच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले , ज्यामुळे मानवी चैतन्य कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा आगळे ठरते. कृत्रिम बुद्धिमत्ता एखादी व्यवस्था मोडू शकते आणि जलद बदल घडवून आणू शकते याकडे लक्ष वेधत कपूर यांनी सर्जनशीलता आणि बदलांसोबत येणाऱ्या अज्ञात गोष्टी आणि भीती यांना जवळ करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
आपल्या चित्रपट सृष्टीच्या प्रवासाबद्दल बोलताना कपूर यांनी अज्ञाताची भीती आणि गूढतेची कल्पना कलात्मक प्रयत्नांना कशी चालना देते ते स्पष्ट केले. “मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची भीती वाटते. म्हणूनच माझे सर्व चित्रपट वेगवेगळ्या शैलीचे आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता गोंधळ निर्माण करत नाही, मात्र बदल अविश्वसनीय वेगाने होत आहेत आणि मनुष्य ते हाताळू शकत नाही असे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ताचे वर्चस्व असलेल्या जगात, कलाकार आणि तत्त्वज्ञांनी नेतृत्व करायला हवे कारण ते गोंधळाची स्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. अवास्तव कारण शोधण्यातील कलेच्या भूमिकेवर भर देत "सर्व कला या आत्म-शोधाची एक सर्जनशील कृती आहे" असे सांगून त्यांनी तात्विक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले.
कृत्रिम बुद्धिमत्ताचा जलद अवलंब याबाबत बोलताना कपूर यांनी त्याची अपरिहार्यता आणि समाजांनी त्याच्या शक्यतांवर विचार करण्याची गरज मान्य केली. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनात्मक स्वरूपाचे स्वागत केले आणि अशा भविष्याची कल्पना केली जिथे तर्क आणि कारण सर्जनशीलतेला वाव देतात. कपूर यांनी बदलाची आवश्यकता लक्षात घेऊन, अस्तित्वाच्या परिदृश्यात निर्मिती आणि विनाशाच्या चक्रीय स्वरूपावर भर दिला.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1980264)
Visitor Counter : 107