माहिती आणि प्रसारण मंत्रालय

54 व्या इफ्फीमध्ये 'मोशन चित्रपटांचे डिजिटल संवर्धन ' यावर मास्टरक्लासचे आयोजन


चित्रपटाची कलात्मक अखंडता कायम राखत त्याचे सौंदर्य वाढवणे हे चित्रपट पुनर्संचयित करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट असायला हवे : थिओडोर ई. ग्लक

Posted On: 26 NOV 2023 10:35PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2023

 

आज चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट किंवा फाइल आधारित निर्मिती  डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे संग्रहित करण्याच्या सतत उद्भवणाऱ्या वास्तवाचा सामना करावा लागतो. गोवा येथे 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ‘डिजिटल मोशन पिक्चर प्रिझर्व्हेशन’ या विषयावर एक मास्टरक्लास सत्र आयोजित करण्यात आले होते. दिग्गज चित्रपट पुनर्संचयन तज्ञ आणि चित्रपट इतिहासकार, थिओडोर ई. ग्लक यांच्या नेतृत्वाखालील मास्टरक्लासचा उद्देश , डिजिटल स्वरूपात मोशन पिक्चर जतन करण्याच्या ‘अकादमी डिजिटल प्रिझर्वेशन फोरम’च्या प्रयत्नांवर बळ देणे हा होता. ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचा हा उपक्रम आहे.

यावेळी बोलताना थिओडोर ई. ग्लक यांनी मूळ कामाच्या सौंदर्यदृष्टीला  हानी पोहोचू नये म्हणून पुनर्संचयित करणाऱ्या व्यावसायिकांनी पाळला जाणारा तरल  समतोल अधोरेखित केला. "मूळ कामाची कलात्मक अखंडता आणि हेतू जपत डिजिटल पद्धतीने जतन  करणे हे आव्हान आहे.  चित्रपटात बदल करण्याऐवजी तो अधिक कलात्मक बनवणे हे  मुख्य ध्येय असणे आवश्यक आहे," असे ते पुढे म्हणाले.  कोणत्याही पुनर्संचयित प्रकल्पात चित्रपट निर्मात्यांच्या मूळ कलात्मक हेतूचा आदर करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

पुनर्संचयन आणि संवर्धनाशी  निगडीत लक्षणीय  खर्च हा मास्टर क्लासमधील महत्त्वाचा पैलू होता. "तुम्ही पुनर्संचयन  प्रकल्पाद्वारे काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात यावर खर्च अवलंबून आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. मानवी हस्तक्षेपाचे महत्त्व अधोरेखित करताना थिओडोर यांनी भविष्यात  चित्रपट संवर्धनात  कृत्रिम बुद्धिमत्तेची विकसित होणाऱ्या भूमिकेकडे देखील लक्ष वेधले.

डिजिटायझेशनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नांना उत्तर देताना, थिओडोर यांनी प्रेक्षकांना आश्वस्त केले की डिजिटाईज्ड चित्रपटाच्या आशय सामग्रीच्या सुरक्षित एन्क्रिप्टेड स्टोरेजसाठी उपाय सहज उपलब्ध आहेत.

सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्स (SMPTE) - इंडिया विभागाचे अध्यक्ष उज्वल एन निरगुडकर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

 

अधिक माहितीसाठी व्हॉटस् अ‍ॅप  चॅनेलवर सहभागी व्हा  

https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1980063) Visitor Counter : 99


Read this release in: Hindi , English , Urdu