संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बंगळूरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) दिली भेट


एचएएल च्या वाढत्या क्षमतांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 25 NOV 2023 8:52PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 25 नोव्हेंबर 2023 रोजी कर्नाटकातील बंगळूरू येथे हलक्या वजनाच्या 'तेजस' या ट्विन-सीटर लढाऊ विमानामधून पहिल्यांदाच उड्डाण केले आणि त्यानंतर त्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशांतर्गत डिझाइन आणि  विकसित केलेल्या तेजस लढाऊ विमानातून उड्डाण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
पंतप्रधानांनी बंगळूरू मध्ये एलसीए तेजस विमानाच्या उत्पादन सुविधांची पाहणी केली.  ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी एचएएलमध्ये सुरू असलेल्या तंत्रज्ञान विषयक   कामाची त्यांना यावेळी माहिती देण्यात आली.
पंतप्रधानांनी एलसीए तेजस विमानाच्या फायनल असेंब्ली विभागाला भेट दिली आणि विमानाच्या क्षमतेबाबत चर्चा केली. त्यांना हलक्या, सर्व प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि बहु-विध भूमिका बजावणाऱ्या तेजस विमानाच्या क्षमतांची माहिती देण्यात आली. तेजसला भारतीय हवाई दलात कार्यरत करण्यात आले आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये ते लढाऊ विमानांच्या ताफ्याचा प्रमुख भाग बनेल.

पंतप्रधानांनी एलसीए तेजसच्या उत्पादन विभागांना भेट दिली आणि विमानाच्या विविध वैशिष्ट्यांवर अभियंत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी देशांतर्गत विकसित एलसीए तेजस विमानाच्या क्षमतेची आणि एचएएलमध्ये उपलब्ध उत्पादन सुविधांची प्रशंसा केली. 'प्रचंड' हे हलक्या वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच), अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर-डब्ल्यूएसआय रुद्र आणि लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर यांसारखी विविध स्वदेशी हेलिकॉप्टरही पंतप्रधानांना दाखवण्यात आली.

एचएएलने लेह/लडाख आणि पूर्व हिमालयीन क्षेत्रात अती-उंचीवर तैनात करण्याच्या क्षमतेवर  भर देत, 'प्रचंड' विमानाची लढण्याची क्षमता आणि कामगिरीबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. हेलिकॉप्टर 6 किमी उंचीपर्यंत उड्डाण करू शकते, अशी माहिती देण्यात आली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी X समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये सांगितले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी तेजस लढाऊ विमानातून केलेले उड्डाण, भारताच्या संरक्षण प्रणालीवरील त्यांचे बारीक लक्ष आणि त्यांना वाटणारा अभिमान याचे निदर्शक आहे. पंतप्रधान मोदी यांच्या  मार्गदर्शनाखाली भारताचे संरक्षण उत्पादन झपाट्याने वाढत आहे, असे त्यांनी म्हटले आहे

पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान एचएएल चे सीएमडी सीबी अनंतकृष्णन उपस्थित होते. सतत पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या भेटीने एचएएल ला हवाई क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने काम करायला प्रेरणा दिली आहे.

 

***

Gopal C/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1979865) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi