माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘कथा सांगण्याची आवड’ या विषयावरील संवाद सत्रात तरुण चित्रपट निर्मात्यांनी उलगडली आपल्यापुढील आव्हाने


आजच्या चित्रपट निर्मात्यांना आशयसंपन्न साहित्य निर्माण करण्याचे अधिक स्वातंत्र्य आहे: सागर पुराणिक

ओटीटी मुळे कमी बजेटचे चित्रपट बनवणाऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले: जसमीत के रीन

चित्रपट निर्मितीसाठी संयम हा महत्वाचा गुण आहे: राजदीप पॉल

मराठी चित्रपटांना ‘स्क्रीन स्पेस’ मिळवण्यासाठी हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपटांबरोबर स्पर्धा करावी लागते: निखील महाजन

Posted On: 25 NOV 2023 9:38PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2023

 

नवीन चित्रपट निर्माते रोज नवनवीन पायंडा पाडत आहेत, ताज्या, खोलवर रुजलेल्या आणि नव-कल्पनेनी सजलेले नवीन सिनेमा ते बनवत आहेत. मात्र, सिनेमाची भाषा नव्याने परिभाषित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये, तरुण चित्रकर्मींनी आपला आवाज ऐकला जावा यासाठी भयंकर  अडथळ्यांची मालिका पार करायला हवी. 54 व्या इफ्फी मध्ये आयोजित केलेल्या संभाषण सत्राने, आपण ज्या चित्रपटांची प्रशंसा करतो, ते बनवणाऱ्या तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांचा संघर्ष, आव्हाने आणि चित्रपट बनवण्यातील आनंद याबाबतचे विचार मांडायला एक व्यासपीठ प्रदान केले.  

कन्नड चित्रपटावर लक्ष केंद्रित करून दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट निर्माते सागर पुराणिक यांनी आपला बाल कलाकार ते कथाकथानकार हा प्रवास उलगडला. चांगल्या भूमिकेची वाट पाहणे सोडून, आपण आकर्षक कथानक सांगण्याकडे कसे वळलो, हे सांगताना ते म्हणाले की, आजचे चित्रपट निर्माते सर्व प्रकारच्या मर्यादांवर मात करत चांगला आशय प्रेक्षकांपुढे मांडण्यावर भर देतात.  

एका वेळी एकच कल्पना मनात असते, या संकल्पनेला छेद देत सागर पुराणिक म्हणाले, "मी नेहमी एकाच वेळी अनेक कथांचा विचार करत आलो आहे, त्या सर्व माझ्या हृदयातून स्फुरल्या आहेत.”  आर्थिक बाबी आणि दर्जेदार चित्रपटांचा पाठपुरावा यामधील समतोल विचारात घेऊन कौतुकाबरोबर आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीबाबत त्यांनी विचार मांडला.

डार्लिंग्स चित्रपटाच्या दिग्दर्शक जसमीत के. रीन, यांनी आपण चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या क्षेत्राकडून  चित्रपटसृष्टीमध्ये कसे आलो, याबद्दल आणि आपला पहिला चित्रपट बनवताना आपल्यासमोर आलेल्या आगळ्या वेगळ्या आव्हानांबद्दल सांगितले. आलिया भट्ट, शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांची भूमिका असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, आणि एक बिगर इंग्रजी भाषेतील भारतीय चित्रपट म्हणून त्याला सर्वाधिक जागतिक पसंती मिळाली. ओटीटी व्यासपीठाच्या विस्तारामुळे बदललेल्या परिस्थितीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ओटीटी मुळे जास्तीतजास्त चित्रपट निर्मात्यांना कमी-बजेटचे चित्रपट बनवण्याची संधी मिळाली. दिग्दर्शनाच्या प्रवासामधील संयमाच्या महत्त्वावर, तसेच निंदा आणि कटुता यापासून दूर राहण्याच्या सावधानतेवर त्यांनी भर दिला.

चित्रपटांमधील पात्र योजनेच्या महत्त्वाबद्दल जसमीत के. रीन म्हणाल्या की, पात्रे खूप महत्त्वाची असतात कारण ती कथा पुढे घेऊन जातात. “मला कथेतील प्रत्येक पात्र माहित असणे आवश्यक आहे, जरी ते चित्रपटात पाच मिनिटे दिसत असले तरीही. मी मानसशास्त्र आणि पात्रांच्या पार्श्वभूमीवर खूप काम करते,” त्या पुढे म्हणाल्या.

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-लेखक राजदीप पॉल यांनी बंगाली चित्रपटसृष्टीसमोरील वेगळ्या स्वरूपाच्या आव्हानांचा उलगडा केला. "कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक सिनेमा यांच्यातील संघर्षांमुळे बंगाली सिनेमाला हानी पोहोचली आहे," पॉल यांनी नमूद केले. कोविड-19 महामारीच्या काळात चित्रित झालेला त्यांचा कलकोक्खो (हाऊस ऑफ टाईम) या चित्रपटाने केवळ आव्हानांवर मात केली नाही, तर उल्लेखनीय यशही मिळवले. राजदीप पॉल यांनीही कथाकथनातील उत्कटतेची गरज अधोरेखित करून चित्रपट निर्मितीमधील  संयमाच्या महत्त्वावर भर दिला. फिल्म स्कूलच्या भूमिकेचे महत्व मान्य करून, त्यांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक आणि काम करताना मिळत असलेल्या प्रशिक्षणावर भर दिला. चित्रपटांच्या  डबिंगचे महत्व यावरील प्रश्नाला उत्तर देताना राजदीप पॉल म्हणाले की, मोठ्या चित्रपटांना डबिंगमुळे चांगले यश मिळते, मात्र छोट्या आर्ट हाउस चित्रपटांना केवळ चांगल्या सबटायटल्सची गरज असते.

गोदावरी साठी प्रसिद्ध असलेले लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक निखील महाजन, ज्यांना  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रतिष्ठेचा गोल्डन लोटस, तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, त्यांनी आपले मराठी चित्रपटांपुढील आव्हाने विषद करताना सांगितले की, मराठी चित्रपटांना स्क्रीन स्पेस’, अर्थात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनासाठी पडदा मिळवताना हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपटांशी स्पर्धा करावी लागते. ‘सैराट’ सारख्या चित्रपटाचा प्रभाव अधोरेखित करत ते म्हणाले की, मराठी सिनेमालाही चांगला प्रेक्षक असल्याचा हा दाखला आहे.  

अनेक जणांनी दिग्दर्शक होण्याचे आपले स्वप्न आहे, असे सांगितल्यावर महाजन यांनी स्पष्ट केले, “जोपर्यंत तुम्हाला चित्रपट आवडत नाहीत तोपर्यंत तुम्ही चित्रपट बनवू शकत नाही कारण त्यात वेळखाऊ आणि कठीण प्रक्रिया असते.” बॉलीवूड चित्रपट करायला आवडेल का, यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, त्यांना बॉलीवूडचे विशेष आकर्षण नाही, मात्र एखाद्या विषयाची तशी मागणी असेल, तरच ते हिंदी भाषेत चित्रपट बनवतील.    

मिड-डे वृत्तपत्राचे मनोरंजन विभागाचे संपादक, आणि रामनाथ गोएंका पुरस्कार विजेते मयंक शेखर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979848) Visitor Counter : 93


Read this release in: English , Hindi , Urdu