माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

कलेमध्ये गुंतवणूक करणे आणि अॅनिमेशनमधील प्रतिभेचे संगोपन करणे खूप महत्त्वाचे आहे, मुलांना कथा सांगण्यासाठी अॅनिमेशन हे एक सुंदर स्वरूप आहे: चित्रपट निर्माते शुजीत सरकार


भारतीय चित्रपट उद्योगाने अॅनिमेशनला सिनेमाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्यायला हवे: iRealities चे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद आजगावकर

इफ्फी 54 मध्ये अॅनिमेशन फिल्म्सवरील विशेष सत्राचे आयोजन

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2023

 

“भारतीय चित्रपट उद्योगामधील प्रतिभा आणि नवोन्मेष अॅनिमेशन चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी उपयोगी ठरू शकेल”, ख्यातनाम भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते शुजीत सरकार म्हणाले. ते आज गोव्यामध्ये आयोजित 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात iRealities चे संस्थापक-व्यवस्थापकीय संचालक प्रसाद आजगावकर यांच्यासमवेत 'भारतीय चित्रपटांमध्ये अॅनिमेशनचा वाढता वापर', या विषयावरील पत्रकार परिषदेत माध्यमांना संबोधित करताना बोलत होते.

अॅनिमेशनचे सार आणि त्यातील बारकावे यावर भर देताना शूजित सरकार म्हणाले की, भारतीय दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अॅनिमेशनद्वारे कथानक आणि कथाकथनाचे तंत्र आजमावायला हवे. “अ‍ॅनिमेटेड चित्रपट आणि कथाकथनाला प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. डिस्ने आणि पिक्सार यासारखे बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय स्टुडिओ भारतातील स्रोत वापरत आहेत. स्वदेशी अॅनिमेशन उद्योगामध्ये बहरण्यासाठी ही प्रतिभा भारतातच राहायला हवी. जास्तीतजास्त अॅनिमेटेड चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहांनाही वाव द्यायला हवा. आपल्याकडे चांगली संहिता असेल, तर चित्रपट बनवण्यासाठी कोणताही फॉरमॅट वापरता येईल.”

सर्जनशील निर्माता म्हणून ब्रह्म कुमारी संस्थेचे संस्थापक - दादा लेखराज कृपलानी यांच्या वास्तविक जीवनावरील, 'द लाइट: अ जर्नी विदिन' या त्यांच्या पहिल्या अॅनिमेटेड माहितीपटाबाबत प्रश्नाला उत्तर देताना, शूजित सरकार म्हणाले की, ब्रह्मकुमारी ज्या मानसिक आरोग्यावर काम करतात, तो विषय आजच्या जगात अत्यंत महत्त्वाचा आहे. "नवीन संधी शोधण्यासाठी मी या चित्रपटात सर्जनशील सल्लागार म्हणून सहभागी झालो."

iRealities चे संस्थापक-व्यवस्थापकीय संचालक प्रसाद आजगावकर यांनी हा मुद्दा मांडला की, भारतीय चित्रपट उद्योगात अॅनिमेशनद्वारे दृश्य कथा सांगण्याचे तंत्र अभावाने दिसून येते. अॅनिमेशन चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. भारतीय अॅनिमेटेड चित्रपटांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्ये ओळख मिळत असल्याचे अधोरेखित करत आजगावकर म्हणाले की, “गुरु गोविंद सिंग यांच्या पत्नी, माता साहिब कौर यांच्यावरील सुप्रीम मदरहूड या पहिल्या पंजाबी अॅनिमेटेड चित्रपटाचा ब्रिटीश संसदेत प्रीमियर झाला”. आपल्या देशात प्रेक्षकसंख्या कमी असल्यामुळे छोट्या प्रॉडक्शन हाऊसेसना अॅनिमेटेड चित्रपट बनवताना बजेटची मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  

यावेळी बोलताना गॉडलीवुड स्टुडिओचे कार्यकारी संचालक हरिलाल भानुशाली म्हणाले की, अॅनिमेशन एक स्वतंत्र व्यक्तिरेखा तयार करते जी कथाकथनामधून आपल्या प्रेक्षकांशी खोलवर  जोडली जाऊ शकते. अॅनिमेशनद्वारे ‘द लाइट: अ जर्नी विदिन’ या चित्रपटातून दादा लेखराज कृपलानी यांचा जीवनसंघर्ष, त्यांचा महिला हक्कांसाठीचा लढा आणि ध्यानाचे महत्त्व दाखवण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या 54 व्या इफ्फीमध्ये बारा अॅनिमेटेड चित्रपट दाखवले जात आहेत. महोत्सवात स्वदेशी अॅनिमेटेड चित्रपटांसह जगभरातील सौंदर्यशास्त्र दृष्ट्‍या सर्जनशील अॅनिमेटेड चित्रपटांचे प्रदर्शन, भारतातील अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन आणि चालना देईल अशी आशा आहे.  

 

* * *

PIB Mumbai | S.Nilkanth/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1979676) Visitor Counter : 96


Read this release in: English , Hindi