माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

इफ्फी 54 मध्ये ‘मंडली’ चित्रपट ICFT-UNESCO गांधी पदकाच्या स्पर्धेत


‘मंडली’ ही रामलीला कलाकार, त्यांचे जीवन आणि त्यांच्यापुढील आव्हानांची कथा: दिग्दर्शक राकेश चतुर्वेदी

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2023

 

हिंदी चित्रपट ‘मंडली’ हा एका रामलीला कलाकाराच्या जीवनामधून तत्कालीन नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा शोध घेतो. हा चित्रपट गोव्यामध्ये आयोजित 54 व्या इफ्फी मध्ये, प्रतिष्ठेच्या ICFT-UNESCO गांधी पदकाच्या स्पर्धेत आहे. हा चित्रपट बनवणारे राकेश चतुर्वेदी ओम आणि निर्माते प्रशांत कुमार गुप्ता यांनी आज गोव्यात माध्यमांशी संवाद साधला. या चित्रपटाच्या निर्मितीमधील सृजनशील प्रक्रियेबद्दल सांगताना चतुर्वेदी ओम म्हणाले की हा चित्रपट मुन्शी प्रेमचंद यांच्या रामलीला या कथेपासून प्रेरित आहे. ते पुढे म्हणाले की या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.  

पारंपारिक लोककलाकारांना मिळणारे अल्प उत्पन्न आणि त्यांचा संघर्ष याविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, की त्यांनी चित्रपटात खऱ्या रामलीला कलाकारांकडून काम करून घेण्याचा  प्रयत्न केला असून, तरुणांना आकर्षित करतील असे मनोरंजनाचे घटक जोडले आहेत. ते म्हणाले की, यामुळे चित्रपट अधिक प्रभावी होईल, कलाकारांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना अधिक चांगला मोबदला मिळेल.  ते पुढे म्हणाले की त्यांनी या चित्रपटाच्या संकल्पनेबाबत विस्तृत संशोधन केले आहे आणि रामलीला या कलेचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

निर्माते प्रशांत कुमार गुप्ता म्हणाले की, त्यांच्या चित्रपटाद्वारे रामलीलाची संस्कृती मूळ स्वरूपात पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल इफ्फीचे आभार मानले, आणि म्हणाले की, आणि इफ्फी 54 मध्ये ICFT-UNESCO गांधी पदकासाठी नामांकन मिळणे म्हणजे, त्यांच्यासाठी स्वप्न साकार झाले  आहे.

येथे पूर्ण संवाद पहा: 

 

सारांश:

मंडली हा चित्रपट, सामाजिक विवेक कमी होत असताना आणि सांस्कृतिक आणि पारंपारिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना आपली नीतिमत्ता टिकवून ठेवण्याच्या नायकाच्या संघर्षमय प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवते. पुरुषोत्तम चौबे उर्फ पुरू हा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका इंटरमिजिएट महाविद्यालयात शिपाई आहे. तो त्याचे काका रामसेवक चौबे यांच्या रामलीला मंडळीमध्ये लक्ष्मणाची भूमिका करतो आणि त्याचा चुलत भाऊ सीताराम चौबे रामाची भूमिका साकारतो. सीतारामच्या अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांना एका सादरीकरणा दरम्यान कार्यक्रम मधेच बंद करावा लागतो, आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अपमान सहन न झाल्याने आणि भगवंतांचा अवमान केल्याच्या अपराधी भावनेमुळे रामसेवक रामलीलामध्ये काम करणे कायमचे बंद करतो. पुरूच्या पलायनवादाचा रामसेवक निषेध करतो, आणि आपल्या कुटुंबाला सन्मानाने रंगमंचावर परत आणण्यासाठी संघर्षाचा प्रवास सुरू करतो.   

 

* * *

PIB Mumbai | S.Nilkanth/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1979673) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Hindi