माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

माध्यमांसाठीच्या कार्यशाळेत पत्रकारांनी घेतले चित्रपट रसग्रहणाचे धडे, गोवा येथील 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी पूर्ण

Posted On: 17 NOV 2023 10:08PM by PIB Mumbai

पणजी, गोवा - 17 नोव्हेंबर, 2023

येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून गोवा येथे 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात होणार आहे.


दरम्यान, चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येत असलेल्या चित्रपटांचे रसग्रहण अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी पत्र सूचना कार्यालयाने भारतीय राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, पुणे (एफटीआयआय) तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांच्यामार्फत पणजी येथे गोव्यातील पत्रकारांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.


प्रसार माध्यम प्रतिनिधींना अशा महोत्सवातील दर्जेदार चित्रपटांचा अधिक समृद्ध आणि आशयघन अनुभव घेता यावा, यासाठी हा अभिनव उपक्रम पीआयबी आणि एनएफडीसी ने राबवला. या कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांनी सिनेमा क्षेत्रातील त्यांचे अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर कार्यशाळेत प्रभावी मार्गदर्शन केले.
या मान्यवरांमधे, सेंटर फॉर ओपन लर्निग चे कार्यकारी प्रमुख आणि एफटीआयआय, पुणे येथील टीव्ही डायरेक्शन विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद दामले, इफ्फी 2023चे कलादिग्दर्शक पंकज सक्सेना, अनुभवी कॅमेरा तज्ज्ञ आणि एफटीआयआयचे प्राध्यापक डॉ.बिस्वा बेहुरा यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.


डॉ.मिलिंद दामले यांनी कार्यशाळेची सुरुवात ' चित्रपट रसग्रहण म्हणजे काय आणि कशासाठी?' या विषयावरील  सत्राने केली. सहभागी पत्रकारांमधे चित्रपटांविषयी रुचि आणि आवड अधिक सखोल करत, डॉ. दामले यांनी चित्रपट रसास्वादाचे सखोल बारकावे समजावून सांगितले. चित्रपटातील गूढ गहन गोष्टी उलगडत ही कला कशामुळे भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनली आहे, याचे मार्मिक वर्णन केले.
प्रा. पंकज सक्सेना यांनी चित्रपट रसग्रहणाचा एकेक पदर उलगडून दाखवत, उपस्थितांना चित्रपट एक कला म्हणून अधिक सखोल पणे कसा समजून घ्यावा, सिनेमॅटिक मास्टरपिसेस कसे तयार होतात, याचे मर्म सांगितले. प्रसार माध्यमे आणि चित्रपट कर्मी दोघांमध्येही समाजात आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची ताकद असते, असे सक्सेना यावेळी म्हणाले.
कथा सांगण्यात, दृश्यांची ताकद किती महत्वाची असते, हे सांगताना डॉ. बिश्वा बेहुरा म्हणाले,की कथानक किंवा आशय आणि दृश्य एकमेकांपासून वेगळे करताच येणार नाहीत, आणि दृष्यांमुळेच चित्रपटातील कथानकाला उठाव येऊ शकतो. त्यानंतरच्या सत्रात, डॉ दामले यांनी चित्रपट ' ऐकायचा ' कसा? आणि चित्रपट संपादनाची कला याविषयी मार्गदर्शन केलं. ध्वनि आणि एडिटिंग ची चित्रपटातील भूमिका त्यांनी विशद केली.
कार्यशाळेचा समारोप करताना, डॉ दामले यांनी अशी आशा व्यक्त केली, की यातून पत्रकारांना चित्रपटांविषयी अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता येईल आणि अधिक समृध्द होऊन नव्या दृष्टीने ते चित्रपट महोत्सवाचे वार्तांकन करु शकतील. चित्रपट रसग्रहण कार्यशाळा प्रत्येक इफ्फी च्या आधी आयोजित केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या कार्यशाळेच्या संदर्भाने काही निवडक लघुपट देखील दाखवले जातील, असे ते म्हणाले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींनी उत्साहाने चर्चा करत, तज्ज्ञ मंडळींकडून शंका निरसन करून घेतले. तसेच या अभिनव उपक्र मात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

***

Harshal A/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1977788) Visitor Counter : 101


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada