वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातून युरोपला सागरी मार्गाने पाठवण्यात येत असलेल्या केळ्यांच्या पहिल्या प्रायोगिक खेपेच्या निमित्ताने अपेडाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 10 NOV 2023 6:50PM by PIB Mumbai

 

भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून प्रायोगिक तत्वावर या खेपेच्या निर्याती निमित्त कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने(अपेडा) महाराष्ट्रात पुण्याजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन केले.भारतीय केळ्यांना युरोपच्या बाजारपेठेत आणखी जास्त वाव मिळावा या उद्देशाने या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, आयएएस या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्रातून युरोपला केळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याच्या क्षमतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम म्हणजे भारतीय कृषी निर्यात क्षेत्रात पुढचे पाऊल टाकणारा संस्मरणीय क्षण ठरला. एकूण 19.50 मेट्रिक टन केळी( 1080X18.14 प्रति खोका निव्वळ भार) अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या महाराष्ट्रातील निर्यातदाराकडून निर्यात करण्यात आली. महाराष्ट्रात मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि., वासुंदे, बारामती- कुरकुंभ रोड, दौंड, पुणे येथे या निर्यातदाराच्या पॅकहाऊसमधून ही केळी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. मुंबईत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट(जेएनपीटी)च्या माध्यमातून सागरी मार्गाने या केळ्यांची निर्यात केली जाईल. ही निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी अतिशय सुनियोजित पद्धतीने अपेडाकडून, महाराष्ट्रातील मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या निर्यातदार कंपनीला संपूर्ण पाठबळ देण्यात आले.  भारताच्या केळी निर्यातीच्या क्षेत्रात यामुळे एका नव्या अध्यायाची सुरूवात झाली.

यावेळी अपेडाच्या दिल्लीतील मुख्यालयाच्या फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल डिव्हिजनच्या(FFV Division) महाव्यवस्थापक विनिता सुधांशू, मुंबईमधील प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख आणि उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, राज्य सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी, केळी निर्यातदार, प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी आणि आयएनआय फार्म्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

भारतीय कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वाव देण्यासाठी अपेडाची वचनबद्धता या ऐतिहासिक कार्यक्रमातून अधोरेखित झाली. अशा प्रकारे युरोपला प्रायोगिक तत्वावर केळी पाठवण्याचा हा प्रयत्न निर्यात क्षेत्रामधील एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी आणि युरोपीय बाजारपेठेतील भारताचे स्थान बळकट करण्यासाठी अपेडा अतिशय सक्रीय पद्धतीने हितधारकांसोबत काम करत आहे. 

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1976267) आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी