आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2015 पासून क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये 16% घट तर क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 18% कमी करण्यात भारताने मिळवलेल्या यशाची जागतिक आरोग्य संघटनेने केली प्रशंसा


देशात क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली ही घट जागतिक क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये घट होण्याच्या गतीपेक्षा जवळजवळ दुप्पट

Posted On: 08 NOV 2023 7:18PM by PIB Mumbai

 

जागतिक आरोग्य संघटनेने सात नोव्हेंबर रोजी आपला जागतिक क्षयरोग अहवाल 2023 प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, भारताने क्षयरोग रुग्ण शोध सुधारणा करण्यात प्रचंड प्रगती केली आहे आणि क्षयरोग विरोधी कार्यक्रमावर कोविड -19 चा दुष्प्रभाव दूर केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 19% वाढ नोंदवत, नोंदणीकृत क्षयरोगाच्या रुग्णांपैकी सुमारे 80% रुग्णांपर्यंत उपचार पोहचत आहेत.

भारताच्या प्रयत्नांमुळे 2022 मध्ये (2015 पासून) क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये 16% घट झाली आहे. हे प्रमाण ज्या वेगाने जागतिक क्षयरोगाचे प्रमाण कमी होत आहे ( जे 8.7% आहे) त्याचा जवळपास दुप्पट आहे. भारतात आणि जागतिक स्तरावर याच कालावधीत क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही 18% ने कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2021 मध्ये झालेल्या क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 4.94 लाखांवरून 34% हून अधिक घट नोंदवत 2022 मध्ये 3.31 लाखांपर्यंत कमी झाले आहे.

जागतिक क्षयरोग अहवाल 2022 मध्ये, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारताचा डेटा "अंतरिम" म्हणून प्रकाशित करण्यास तसेच अहवालातील आकड्यांना अंतिम स्वरुप देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक गट आरोग्य मंत्रालयाबरोबर काम करेल यासाठी सहमती दर्शवली होती.

यानंतर, जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तांत्रिक गटात 50 हून अधिक बैठका झाल्या. या बैठकीत देशाच्या तांत्रिक गटाने शोधलेले सर्व नवीन पुरावे, नि-क्षय पोर्टलवरील डेटासह उपचारादरम्यान प्रत्येक क्षयरुग्णाच्या जीवनचक्रातील बदल नोंदवणारे देशांतर्गत विकसित गणितीय प्रारुप सादर केले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तुकडीने या गटाने सादर केलेल्या सर्व डेटाचे सखोल पुनरावलोकन केले आणि केवळ त्याचा स्वीकार केला नाही तर देशाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा देखील केली. यावर्षी, जागतिक क्षयरोग अहवालाने भारतासाठीचे क्षयरोगासंबंधी अंदाजी आकडे, विशेषत: क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांत घट होत असल्याचे सुधारित अंदाज मान्य केले आहेत आणि ते प्रकाशितही केले आहेत.

भारताच्या क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याच्या उच्च धोरणांमुळे 2022 मध्ये 24.22 लाख इतकी आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली गेली. ही संख्या कोविडपूर्व काळापेक्षाही अधिक आहे, अशी नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

बाधित रुग्ण शोधण्याचे विशेष अभियान, आण्विक निदानाचे प्रमाण गट स्तरापर्यंत वाढवणे, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राद्वारे स्क्रीनिंग सेवांचे विकेंद्रीकरण आणि खाजगी क्षेत्रातील सहभाग यांसारख्या सरकारने सुरू केलेल्या आणि विकसित केलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांमुळे रुग्ण नोंदणीतून सुटण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून समाजातील सर्व स्तरातील 1 लाखाहून अधिक नि-क्षय मित्रांनी 11 लाखांहून अधिक क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2018 मध्ये प्रारंभ झाल्यापासून नि-क्षय पोषण योजनेअंतर्गत 95 लाख क्षय रूग्णांना सुमारे 2613 कोटी रुपये मदत रुपाने वितरित केले गेले आहेत. मृत्यूदरात आणखी घट आणि उपचारांच्या यश दरात सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी काळजी घेणारे कुटुंबीय प्रारुप आणि विशेष काळजी प्रारुप या सारखे नवीन रुग्ण केंद्रित उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी अतिरिक्त संसाधनांची गुंतवणूक करून क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना प्राधान्य देण्यासाठी भारताने धाडसी पावले उचलली आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975769) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati