वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात
Posted On:
01 NOV 2023 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
भारत आणि श्रीलंका यांच्यात 30 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील (ईटीसीए) वाटाघाटीची बारावी फेरी पार पडली. दोन्ही देशांमध्ये 2016 ते 2018 दरम्यान, द्विपक्षीय चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या. त्यानंतर या वाटाघाटी थांबवण्यात आल्या होत्या.
श्रीलंकेच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व, वाटाघाटी पथकाचे प्रमुख के जे वीरासिंघे यांनी केले, तर भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व वाणिज्य विभागाचे सहसचिव आणि वाटाघाटी पथकाचे प्रमुख अनंत स्वरूप, यांनी केले.
या फेरीदरम्यान, दोन्ही बाजूंनी अकराव्या फेरीपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये, वस्तूंचा व्यापार, व्यापारातील तांत्रिक अडथळे, स्वच्छताविषयक आणि फायटोसॅनिटरी उपाययोजना, सेवांचा व्यापार, सीमाशुल्क विभागाच्या प्रक्रिया आणि व्यापार सुविधा, मुलभूत नियम, व्यापार विषयक उपाययोजना, आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य आणि विवादांचा निपटारा, या मुद्द्यांचा समावेश होता. दोन्ही बाजूंनी परस्पर सहयोगाची आणि सृजनशील उपाय शोधण्याची आवश्यकता असलेली क्षेत्रे निश्चित केली.
या फेरीदरम्यान, दोन्ही बाजूंनी अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि नऊ समस्यांचे निराकरण झाल्यामुळे, त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. पोशाख आणि मिरचीचा कोटा आणि औषधांची खरेदी यासारख्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली, आणि दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू ठेवण्याचा आणि प्रकरणाच्या निराकरणासाठी नवीन पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला.
प्रस्तावित ईटीसीए दरम्यान, नवीन घडामोडींवर प्रतिसाद देताना शक्य असेल तेव्हा आपल्या पूर्वीच्या मतावर ठाम राहण्याबरोबरच, यापूर्वीच्या प्रगतीवर आधारित उपाययोजना करण्याच्या गरजेवर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. या वाटाघाटींमुळे, दोन्ही देशांसाठी व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या नव्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. भारत-श्रीलंका ईटीसीए, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरेल. या फेरी दरम्यान, भारत आणि श्रीलंका व्यापार भागीदारीमधील प्रचंड क्षमतेला आणि परस्पर हिताच्या क्षेत्रात आर्थिक संबंध वाढवण्याच्या शक्यतांना दोन्ही बाजूंनी दुजोरा दिला.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973959)
Visitor Counter : 137