महिला आणि बालविकास मंत्रालय
“यशस्विनी” मोहिमेतील महिला बाइकस्वार पथक सोनीपत येथील सीआरपीएफच्या गट केंद्राच्या ठिकाणी दाखल
महिलाशक्तीचा उत्सव साजरा करण्याच्या हेतूने सीआरपीएफने केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयासह संयुक्तपणे या देशव्यापी बाईक मोहिमेचे केले आयोजन
Posted On:
17 OCT 2023 5:19PM by PIB Mumbai
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वैशिष्ट्यपूर्ण भागीदारीसह, “यशस्विनी” या केवळ महिलांसाठीच्या मोटरसायकल मोहीम 2023 मधील महिला बाइकस्वारांचे पथक सोनीपत येथील सीआरपीएफच्या गट केंद्राच्या ठिकाणी दाखल झाल्याची घोषणा केली.
एकूण 50 बाइकस्वार/सह-स्वार यांच्या मोठ्या पथकाने सुरु केलेल्या या असामान्य प्रवासाची सुरुवात दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीनगर येथून झाली आणि हे पथक 15 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 2 वाजता सोनीपत येथील सीआरपीएफच्या गट केंद्राच्या ठिकाणी पोहोचले. या पथकाच्या स्वागतासाठी आयोजित समारंभामध्ये जागतिक दर्जाची ऑलिम्पिकपटू बबिता फोगाट हिने मोठ्या अभिमानाने झेंडा फडकावून बाईकस्वारांचे स्वागत केले. या महत्त्वाच्या प्रसंगी, सोनीपत रेंजचे डीजीआयपी महेंद्र कुमार, तसेच सोनीपत सीआरपीएफचे डीजीआयपी आणि ग्रुप कमांडर कोमल सिंग यांनी उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवली.
सोनीपत येथील सीआरपीएफच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, “बेटी बचाओ, बेटी पढाओ” तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनांवर आधारित मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महिला बाइकस्वार तसेच या केंद्राच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांनी सीअरपीएफच्या विमेन पाईप बँडच्या कलाकारांनी सादर केलेल्या चित्ताकर्षक कार्यक्रमाचा आनंद घेतला.
“भारतीय महिला विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि या बाईक रॅलीने महिला सशक्तीकरणाची नवी द्वारे खुली केली आहेत,” अशा शब्दात प्रमुख पाहुण्या बबिता फोगाट यांनी उपस्थितांना प्रभावी संदेश दिला. देशातील महिलांच्या अधिकाधिक सशक्तीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांवर देखील त्यांनी यावेळी अधिक भर दिला.
सीआरपीएफच्या सहकार्याने, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय “बेटी बचाओ, बेटी पढाओ” संकल्पनेच्या प्रसारासाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे तसेच “यशस्विनी” महिला बाइक मोहिमेच्या माध्यमातून “नारी शक्ती”च्या अदम्य उर्जेचा उत्सव साजरा करत आहे.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1968552)