अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयने मुंबईतील सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

Posted On: 16 OCT 2023 9:19PM by PIB Mumbai

मुंबई, 16 ऑक्‍टोबर 2023

 

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, हाती आलेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी झवेरी बाजार येथील दोन ठिकाणी सोन्याची तस्करी करत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला. यातील पहिल्या ठिकाणी, कायदेशीर खरेदीचा कोणताही पुरावा नसलेली आणि परदेशी शिक्का असलेली 1 किलो सोन्याची बिस्किटे सापडली. पहिल्या धाडीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका ठिकाणी घातलेल्या छाप्यात परदेशी बनावटीचे 7.022 किलो सोने आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले 1,22,10,000/- रुपये (भारतीय चलन) ताब्यात घेण्यात आले. सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी आणखी 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले.  त्यापैकी एका ठिकाणी सोने वितळवण्याचे काम सुरु असलेले आढळून आले.

अशा प्रकारे, या धाडींतून परदेशी बनावटीचे 4,78,74,547 रुपये मूल्याचे तस्करी करून आणलेले 8.022 किलो सोने  आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले 1,22,10,000/- रुपये असा एकूण ऐवज ताब्यात घेण्यात आला.

यापैकी एका ठिकाणचा व्यवस्थापक, जो या टोळीचा सक्रीय सदस्य आहे आणि ज्याच्याकडून परदेशी बनावटीचे सोने जप्त करण्यात आले, त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. टोळीतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

सोने तस्करीमुळे देशाच्या आर्थिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण असून या समस्येचा व्यापक प्रमाणात सामना करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968252) Visitor Counter : 195


Read this release in: English