संरक्षण मंत्रालय

सागरी संशोधन आणि विकास कामासाठी हिंदी महासागर क्षेत्रातील देशांबरोबर दीर्घकालीन वैज्ञानिक भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी समुद्रशास्त्रीय संशोधन जहाज ‘आयएनएस सागरध्वनी’ व्दारे सागर मैत्री मिशन-4 चा प्रारंभ

Posted On: 12 OCT 2023 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023

‘डीआरडीओ’ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक लॅबोरेटरी (एनपीओएल ) चे समुद्रशास्त्रीय संशोधन जहाज आयएनएस सागरध्वनी, आज- 12 ऑक्टोबर, 2023  रोजी दक्षिण जेट्टी, दक्षिणी नौदल कमांड (एसएससी), कोची येथून दोन महिन्यांच्या सागर मैत्री (एसएम) मिशन-4 साठी रवाना झाले.   संरक्षण संशोधन आणि विकास  विभागाचे सचिव  आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (दक्षिण) रिअर अॅडमिरल उपल कुंडू आणि  डीआरडीओ  तसेच भारतीय नौदलाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  सागरध्‍वनी जहाजाला हिरवा झेंडा दाखवला.

सागर मैत्री हा डीआरडीओचा एक अभिनव उपक्रम आहे. त्‍याला  सामाजिक-आर्थिक पैलू आहेत.  तसेच अधिक महत्त्वपूर्ण गोष्‍ट म्हणजे,  सागरी वैज्ञानिक विषयामध्‍ये परस्परसंवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या 'सेफ्टी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन' (SAGAR) या धोरणात्मक घोषणेचे  व्यापक उद्दिष्ट आहे, त्याचे  समर्थन करणारा हा उपक्रम आहे. विशेषतः हिंद महासागर परिक्षेत्रामध्‍ये येणा-या  (आयओआर) देशांमधील महासागर  संशोधन कार्यात सहकार्य वृद्धी करण्‍यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. या धोरणाच्या पूर्ततेसाठी , डीआरडीओने 'MAITRI’  (सागरी आणि सहयोगी आंतरविद्याशाखीय प्रशिक्षण आणि संशोधन उपक्रम)' नावाचा एक वैज्ञानिक घटकांचा समावेश असलेला कार्यक्रम  सुरू केला.  हा कार्यक्रम 'महासागर संशोधन आणि विकास' क्षेत्रात ‘ आयओआर’  देशांसोबत दीर्घकालीन सहयोग प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे

सागर मैत्री कार्यक्रमामध्‍ये , आयएनएस सागरध्वनी 1962-65 दरम्यान आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहिमेत सहभागी झालेल्या आयएनएस  किस्तनाने जो  जलमार्ग स्वीकारला होता, त्याच जलमार्गाचा पुन्हा वापर करणार आहे.  ओमान, मालदीव, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि म्यानमार या आठ आयओआर देशांबरोबर  दीर्घकालीन वैज्ञानिक भागीदारी आणि सहयोग प्रस्थापित करणे हे या  मिशनचे उद्दिष्ट आहे.

याआधीच्या सागर मैत्री मोहिमांमध्ये, प्रतिनिधी मंडळाने एप्रिल 2019 मध्ये यंगून (म्यानमार) ला भेट दिली.  त्यानंतर दुस-या  मोहिमेत (एसएम-2)  ऑगस्ट 2019 मध्ये क्लांग (मलेशिया) आणि सप्टेंबर 2019 मध्ये सिंगापूरला भेट दिली. त्यावेळी तीनही देशांमध्‍ये  एक दिवसीय वैज्ञानिक चर्चासत्र आयोजित केले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये, एनपीओएल ने तिसर्‍या मोहिमेचा (एसएम-3) भाग म्हणून दक्षिणी हिंदी महासागरात समुद्रशास्त्रीय अभ्यास केला. यामध्‍ये  विषुववृत्तीय ट्रान्सेक्टचाही  समावेश होता.

सध्याच्या सागर मैत्री -4  या  मोहिमेत  (एसएम -4) उत्तर अरबी समुद्रात आयएनएस  सागरध्वनी निघाले आहे. यावेळी  वैज्ञानिक  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ओमानच्या  सुलतान काबूस विद्यापीठातील   सागरी विज्ञान आणि मत्स्यव्यवसाय विभागाबरोबर  सहयोगी संशोधन कार्यक्रम सुरू करण्याच्या कार्यक्रमाचा  समावेश आहे. या मोहिमा शास्त्रज्ञांना महासागरांचा अभ्यास करणार्‍या त्यांच्या आयओआर समकक्षांशी सहकार्य करण्याची आणि मजबूत कार्य संबंध निर्माण करण्याची संधी देणार आहे.

आयएनएस सागरध्वनी हे जहाज कोचीच्या एनपीओएलद्वारे डिझाइन केलेले आणि विकसित केलेले आणि जीआरएसई लिमिटेडचे स्वदेशी बनावटीचे जहाज आहे. यामार्फत सागरी पर्यावरणावर  संशोधन केले जाते.  जुलै 1994 मध्ये हे जहाज  लाँच केले गेले. एनपीओएल  महासागर पर्यावरण आणि इतर संबंधित क्षेत्रांचा अभ्यास करणारी संस्था आहे. हे जहाज गेल्या 25 वर्षांपासून विस्तृत सागरी निरीक्षण मोहिमा आणि संशोधन कार्य करीत  आहे.

 

 

 

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1967215) Visitor Counter : 102


Read this release in: English , Urdu , Hindi