सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धीसाठी विश्वकर्मा योजनेत सहभागी होण्याचे केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे विश्वकर्मींना आवाहन


प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिसंवाद आणि मेळाव्याचे आयोजन

Posted On: 05 OCT 2023 6:13PM by PIB Mumbai

मुंबई/ सिंधुदुर्ग, 5 ऑक्टोबर 2023

केंद्र सरकारने गेल्या 17 सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती, कारागिरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरी इथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना परिसंवाद आणि जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ही योजना देशातील पारंपरिक कारागिरांच्या कलाकौशल्याला वाव देणारी असून, त्यांना सन्मानपूर्वक जगण्याचा मार्ग दाखवणारी आहे, असे सांगत, सन्मान , सामर्थ्य आणि समृद्धीसाठी जास्तीत जास्त विश्वकर्मींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.

 पारंपारिक कारागीर आणि कलाकारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पीएम विश्वकर्मा ही योजना तयार केली गेली आहे. ही योजना 18 प्रकारच्या पारंपारिक कारागीर व कलाकारांसाठी असून अशा वस्तूंची पुरवठा साखळी वाढवणे, ती बळकट करणे, आणि विशिष्ट उत्पादने आणि सेवांची मागणी वाढवून लाखो भारतवासीयांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी नारायण राणे यांनी दिली .

कार्यक्रमाला, सूक्ष्म, लघु अतिरिक्त सचिव तथा विकास आयुक्त डॉ.रजनीश, या विभागाच्या उपमहासंचालिका अनुजा बापट  यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. एमएसएमई विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील तज्ञांनी यावेळी युवा विश्वकर्मींना मार्गदर्शन केले .

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक 12 बलुतेदार विश्वकर्मी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात सुतार तसेच नाभिक समाजातील प्रतिनिधींचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. तसेच, विश्वकर्मी कारागीर व कलाकारांची पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणीही करण्यात आली .

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेविषयी  :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. ज्यांनी आपल्या हातांनी आणि साधनांनी राष्ट्र उभारणीच्या कार्यात काम केले आहे, त्या आपल्या पारंपारिक आणि कुशल कारागिरांना न्याय्य सहाय्य प्रदान करण्यासाठी या योजनेला 13,000 कोटींचा अर्थसंकल्पीय निधी दिला गेला आहे.या योजनेच्या माध्यमातून परंपरागत  विविध क्षेत्रातील कारागिराचे काम करणाऱ्यांना प्रशिक्षण , प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून ओळख मिळणार. मूलभूत  तसेच प्रगत प्रशिक्षण विद्यावेतनासह मिळणार आहे . तसेच कारागिरांना त्यांच्या पारंपरिक वस्तू अधिक कौशल्याने आणि सहज बनवता याव्यात यासाठी अत्याधुनिक साधने असलेले टूलकिट  त्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. एवढेच नाही, तर भांडवलाची सोय करण्यासाठी अल्प व्याजदरात कर्ज देखील मिळणार आहे.

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1964746) Visitor Counter : 115


Read this release in: English