वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेच्या 6व्या बैठकीसाठी वाणिज्य सचिव ब्राझील दौऱ्यावर
Posted On:
05 OCT 2023 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेच्या 6 व्या बैठकीसाठी 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर 2023 दरम्यान ब्राझीलला अधिकृत भेट दिली. भारतीय उद्योग महासंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 20 उद्योजकांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत होते. गेल्या दोन वर्षांत द्विपक्षीय व्यापारात दुपटीने वाढ होऊन तो 16 अब्ज डॉलर्सवर गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे .दोन्ही देशांमधील वाढते व्यावसायिक संबंध अधिक बळकट करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.
ब्राझीलच्या अधिकार्यांशी संवाद साधताना, वाणिज्य सचिवांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेदरम्यान ब्राझीलने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांची प्रशंसा केली आणि ब्राझीलने जी 20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्याला पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे नमूद केले.
भारतीय शिष्टमंडळाने ब्राझील उद्योग महासंघ, साओ पाउलोच्या व्यावसायिक संघटना , साओ पाउलोचा उद्योग महासंघ आणि रिओ डी जानेरो मधील उद्योगांसह ब्राझिलच्या प्रमुख संघटनांसोबत चर्चा, व्यवसाय संबंधी बैठका घेतल्या आणि नवीन व्यापार संधींची चाचपणी केली आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींना चालना देण्यासाठी वचनबद्धता प्रदर्शित केली.
भारत आणि ब्राझील दरम्यान वाढत्या व्यापारी संबंधांना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने शिष्टमंडळाने 2 ऑक्टोबर 2023 रोजी विविध व्यापार सुलभता उपक्रमांमध्ये भाग घेतला. साओ पाउलोच्या व्यवसायिक संघटनेबरोबर झालेल्या बैठकीने संभाव्य व्यापार सहकार्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यानंतर व्यापारी समुदायामध्ये संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच व्यापाराला चालना देण्यासाठी नवीन संधींचा शोध घेण्यासाठी ब्राझीलमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांबरोबर संवादात्मक सत्र पार पडले.
भारतात गुंतवणूक केलेल्या ब्राझीलच्या कंपन्यांसोबत 3 ऑक्टोबर रोजी सकाळी एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात परदेशी गुंतवणूकदारांना पाठिंबा देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या बैठकीत नवीन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींवरही चर्चा झाली. बर्थवाल यांनी ब्राझीलमधील आघाडीच्या MICE (मीटिंग्ज, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन) कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि ब्राझीलमधील महत्वपूर्ण साओ पाउलो उद्योग महासंघाबरोबर देखील बैठक घेतली.
4 ऑक्टोबर 2023 रोजी, वाणिज्य सचिवांनी ब्राझिलिया येथे ब्राझीलच्या परराष्ट्र व्यापार सचिव तातियाना लॅसेर्डा प्राझेरेस यांच्यासमवेत भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेच्या 6 व्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. उभय देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली आणि व्यापाराला चालना देण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार केला.
बर्थवाल यांनी उभय राष्ट्रांमधील आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारी पुढे नेण्याबाबत ब्राझीलच्या विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा उपमंत्री मार्सिओ एलियास रोझा यांच्याशीही व्यापक चर्चा केली.
तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक यांसह भारताच्या गतिशील आर्थिक विकासामुळे उपलब्ध झालेल्या संधींबाबत ब्राझीलचे आघाडीचे उद्योग आणि राष्ट्रीय उद्योग महासंघाच्या सदस्यांशी संवाद साधून या भेटीचा समारोप झाला. त्यांनी ब्राझीलच्या उद्योगांना भारतातील वाढत्या पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले.
या भेटीतील चर्चा आणि संवादाने भारत-ब्राझील व्यापार संबंधांमध्ये आशादायक वाढीचे संकेत दिले आहेत. या बैठकांनी नवीन व्यापार संधींचा शोध आणि जागतिक मूल्य साखळी द्वारे द्विपक्षीय एकात्मता बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून भविष्यातील संवादांसाठी एक सकारात्मक वातावरण उपलब्ध केले आहे.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1964724)
Visitor Counter : 128