आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नाशिक येथे 6 -7 ऑक्टोबर 2023 दरम्यान पश्चिमी राज्यांसाठी दुसऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी परिषदेचे आयोजन
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आणि एस पी सिंह बघेल यांच्या हस्ते परिषदेचे होणार उद्घाटन
Posted On:
05 OCT 2023 5:09PM by PIB Mumbai
मुंबई, 5 ऑक्टोबर 2023
पश्चिम विभागीय राज्यांसाठी आयोजित दुसरी प्रादेशिक समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) परिषद 6 आणि 7 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रात नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार आणि एस पी सिंह बघेल यांच्या हस्ते या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ही सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत. आयुष आरोग्य आणि निरामयता केंद्रांपैकी 40 सीएचओसह 200 सीएचओ या परिषदेत सहभागी होतील. डिसेंबर 2022 मध्ये वाराणसी येथे झालेल्या पहिल्या प्रादेशिक सीएचओ परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर ही दुसरी परिषद होत आहे.
संपूर्ण देशभरात लोकांच्या घराजवळ सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी एक मंच म्हणून स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती साधण्याप्रति भारताची वचनबद्धता प्रतिबिंबित होते. आयुष्मान भारत - आरोग्य आणि निरामयता केंद्राकडे भारताच्या प्राथमिक आरोग्य सेवा यंत्रणेचा पाया म्हणून पाहिले जाते . आजपर्यंत, 1.61 लाखांहून अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्र कार्यान्वित आहेत.
समुदाय आरोग्य अधिकारी हे उप आरोग्य केंद्र-आरोग्य आणि निरामयता केंद्रांचा कणा आहेत. ते बहुउद्देशीय कामगार आणि आशा कार्यकर्त्यांच्या चमूच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण क्लिनिकल, व्यवस्थापकीय आणि सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवतात. आत्तापर्यंत, देशभरातील उप आरोग्य केंद्र-आरोग्य आणि निरामयता केंद्रांमध्ये 1.30 लाखांहून अधिक समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
परिषदेत पुढील चार संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले जाईल-
- क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रम - सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा सुरु करणे , निरामय आरोग्यासाठी उपक्रम आणि वार्षिक आरोग्य दिनदर्शिकेप्रमाणे आरोग्य संबंधी विविध दिनविशेष कार्यक्रम आयोजित करणे
- व्यवस्थापकीय कामकाज - आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या सदस्यांचे व्यवस्थापन, नियमित आढावा , सहायक देखरेख आणि प्रशासकीय कामकाज
- समुदाय संपर्क आणि आयुष एकत्रीकरण - जन आरोग्य समिती, ग्रामीण आरोग्य ,स्वच्छता आणि पोषण समिति (व्हीएचएसएनसी) , इतर विभागांशी समन्वय आणि आयुषचे एकत्रीकरण यांच्या समन्वयाने काम करणे.
- माहिती तंत्रज्ञान उपक्रम - ई-संजीवनी आणि नियमित सेवा , टेली-मानस आभा -आयडी द्वारे टेलिमेडिसिन सेवा .
महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव (आरोग्य) एन. नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक धीरज कुमार आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय,आयुष मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य प्रणाली रिसोर्स सेंटरचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील परिषदेला उपस्थित राहतील.
दीड दिवस (1.5 दिवस) कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा आणि नियमित काळजी घेण्याची यंत्रणा समजून घेण्यासाठी उप-आरोग्य केंद्रांना क्षेत्र भेटींचा समावेश असेल. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी, पश्चिम विभागातील राज्यांचे समुदाय आरोग्य अधिकारी चार विषयांवर सादरीकरण करतील आणि प्रख्यात तज्ञ सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेवर आपले विचार मांडतील.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1964682)
Visitor Counter : 147