माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्युरोची  महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध क्षेत्रीय कार्यालये  'एक तारीख एक घंटा एक साथ'  या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यात सहभागी होणार

Posted On: 30 SEP 2023 11:59AM by PIB Mumbai

 

गांधी जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना एक अनोखे आवाहन केले आहे.  मन की बातच्या 105 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सर्व नागरिकांनी एकत्रितपणे 1 तास स्वच्छतेसाठी  श्रमदान करण्याचे आवाहन केले, जी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला बापूंना स्वच्छांजलीअसेल. ही भव्य स्वच्छता मोहीम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत पाळण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता ही सेवा 2023 चा एक भाग आहे.

या भव्य  स्वच्छता मोहिमेद्वारे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी  बाजारपेठ, रेल्वे मार्ग, जलाशय , पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक शहर, ग्रामपंचायत, नागरी विमान वाहतूकरेल्वे, माहिती आणि तंत्रज्ञान  यांसारखे सरकारचे सर्व विभाग ,सार्वजनिक संस्था नागरिकांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता  कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यास इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्था, नागरी कल्याण संस्था, खासगी संस्था  पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्था / जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्वच्छता ही सेवा सिटीझन्स पोर्टल https://swachhatahiseva.com या  खास तयार करण्यात आलेल्या आयटी प्लॅटफॉर्मवर जनतेच्या माहितीसाठी स्वच्छता कार्यक्रम उपलब्ध असतील.  स्वच्छतेच्या ठिकाणी  नागरिक छायाचित्रे काढू शकतात आणि पोर्टलवर देखील अपलोड करू शकतात. या पोर्टलमध्ये नागरिकांना, प्रभावशाली व्यक्तींना या आंदोलनात  सामील होण्यासाठी आणि स्वच्छता दूत बनून लोकांच्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित करणारा एक विभाग देखील आहे.

स्वच्छता हीच ईश्वर सेवा  हा संदेश देण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोची  महाराष्ट्र आणि गोवा विभागातील 7  कार्यालये महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रीय कार्यालये शाळा, स्वयंसेवी संस्था आणि खाजगी संस्थांच्या सहकार्याने  जलाशय, उद्याने आणि नदीच्या आसपासचा  भाग  स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतील. काही ठिकाणी कायमस्वरूपी कचरापेट्या उभारणेभिंत रंगवणे  (नाशिक आणि गोवा), वृक्षारोपण (नागपूर) हे देखील या उपक्रमांचा भाग असतील. चला अशा प्रत्येक उपक्रमांबद्दल  अधिक जाणून घेऊया.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील  नळदुर्ग किल्ला स्वच्छ करण्यासाठी सीबीसी सोलापूर स्वच्छता मोहीम हाती घेत आहे. या मोहिमेसाठी ते राज्य पुरातत्व विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, नगर परिषद, नळदुर्ग, धरित्री विद्यालय आणि युनिटी मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने  1 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग किल्ल्याच्या परिसराची स्वच्छता करतील.

त्याचप्रमाणे सीबीसी औरंगाबाद कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या औरंगाबाद लेण्यांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवण्यात येणार आहे. संभाजीनगर प्लॉगर्स, एनवायकेएस, एनएसएस शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय आणि भारतीय पुरातत्व  सर्वेक्षण औरंगाबाद हे देखील या उपक्रमात सहभागी होतील.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खडका गावातील दत्तसागर तलावाची स्वच्छता करून केंद्रीय संचार ब्युरोचे अहमदनगर कार्यालय देखील  स्वच्छता ही सेवा मोहिमेत सहभागी होणार आहे. या उपक्रमासाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान एज्युकेशन ट्रस्ट सीबीसी अहमदनगरला सहकार्य करणार आहे. 

सीबीसी नागपूरने नागपुरातील गांधी सागर तलावाच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला असून त्यात लायन्स क्लब आणि संत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांचा सहभाग असेल.

सीबीसी वर्धाचे क्षेत्रीय कार्यालय एनसीसी बटालियनसह 1 ऑक्टोबर रोजी धाम रिव्हरफ्रंटची स्वच्छता करेल.

या स्वच्छता मोहिमेअंतर्गत  सीबीसी नाशिकद्वारे नाशिकमधील वालदेवी धरण परिसर आणि मौजे पिंपळद येथील परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.

गोव्यात, सीबीसीचे  पणजी क्षेत्रीय कार्यालय एनसीसीच्या पहिल्या  गोवा बटालियनसह उत्तर गोव्यातील ला कॅम्पाला उद्यानाची  स्वच्छता करणार आहे.

स्वच्छता ही सेवा या उपक्रमाने केवळ स्वच्छ वातावरण राखण्यात योगदान दिले नाही तर लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीवही वृद्धिंगत केली  आहे. यामुळे कचरा व्यवस्थापन पद्धतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. त्याचबरोबर, सार्वजनिक आरोग्यावर कचरा आणि प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरुकता निर्माण केली असून लोक त्यांच्या सभोवतालच्या परिसराबाबत  अधिक जागरूक झाले आहेत.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962382) Visitor Counter : 94


Read this release in: English