इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
रोजगार मेळाव्यांद्वारे, तरुण भारतीयांना सरकारसोबत काम करण्याची आणि भारतातील नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे” : राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महत्त्वाकांक्षा,हिरिरी आणि कर्तव्यकठोरता या मूल्यांना महत्व देते ”: राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
"गेल्या 9 वर्षांत भारतातील शासन आणि राजकीय संस्कृती बदलल्याचे सेवेच्या समान वितरणातून जाणवले आहे : राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची आज पुण्यातील 9व्या रोजगार मेळाव्याला उपस्थिती
Posted On:
26 SEP 2023 8:31PM by PIB Mumbai
पुणे, 26 सप्टेंबर 2023
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी येथे आयोजित 9व्या रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी ,चंद्रशेखर यांनी तरुण भारतीयांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा उल्लेख केला.
आपल्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी नव्याने भरती झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आणि नवीन संसदेत मंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम या ऐतिहासिक पावलाबद्दल सांगितले. देशभरातील रोजगार मेळाव्यात आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या महिलांची लक्षणीय संख्या त्यांनी अधोरेखित केली.
मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पुण्यात नव्याने भरती झालेल्या सर्वांना संबोधित केले. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अतुलनीय ऊर्जा आणि धडाडीसाठी ओळखले जाते. हे सरकार महत्त्वाकांक्षा,हिरिरी आणि कर्तव्यकठोरता या मूल्यांना महत्व देते . आपल्या तरुण भारतीयांना सरकारसोबत काम करण्याची संधी मिळावी यासाठी आपल्या पंतप्रधानांनी कोणतीही कसर सोडलेली नाही.आधुनिक भारताच्या इतिहासातील तरुण पिढी ही सर्वात भाग्यवान आहे यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
देशभरातील नवीन भरती झालेल्यांना 51,000 नियुक्ती पत्रे वितरित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी कार्यक्रमाअंतर्गत पुण्यातील रोजगार मेळावा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजीव चंद्रशेखर उपस्थित होते. 22 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान मोदी यांनी हा उपक्रम सुरू केला होता, याचे उद्दिष्ट 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आहे.
गेल्या 9 वर्षांत प्रशासन आणि राजकीय संस्कृती ज्या सरकारने बदलली आहे त्या सरकारसोबत नव्याने भरती झालेले तरुण भारतीय काम करणार आहेत, हे मंत्र्यानी आपल्या भाषणा दरम्यान अधोरेखित केले.
“नव्याने भरती झालेल्या तरुणांसाठी ही एक अतुलनीय संधी आहे. पंतप्रधान मोदीजींनी भारताचे राजकीय चित्रच बदलून टाकले आहे. शासनाकडे पाहण्याचा आमचा आजचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा खूपच वेगळा आहे. लोकांची सेवा करणे हे एक ध्येय बनले आहे आणि त्यासोबतच आम्ही कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे.अवघ्या एक दशकापूर्वी, भारताकडे अनेकदा अफाट क्षमता असलेला मात्र एक अकार्यक्षम सरकार असलेला देश म्हणून पाहिले जात असे, परंतु आज, जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचा आपण जागतिक अभ्यासाचा भाग बनलो आहोत आणि इतर देश आपल्याकडून शिकण्यास उत्सुक आहेत,” असे राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961065)
Visitor Counter : 85