वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतातील मसाले आपल्या  व्यापारी  सामर्थ्यासोबतच  समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतात: पीयूष गोयल


भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक  कॉरिडॉर म्हणजे गतकाळातील मसाल्यांच्या मार्गाचे वैभव परत आणण्याची संधी

भारतीय मसाल्यांची गाथा सर्वत्र कथन करायला हवी आणि त्यावर लेखनही  व्हायला हवे

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक मसाला परिषद 2023 ला केले संबोधित; वर्ष 2030 पर्यंत 10 अब्ज डॉलर्स मसाला  निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मसाले उद्योगातील भागधारकांनी  एकत्र काम करण्याचे केले आवाहन

Posted On: 16 SEP 2023 5:35PM by PIB Mumbai

 

मसाले भारताला एकजुट  करतात. देशात मसाल्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून  आपल्या  व्यापारी  शक्तीसोबतच  समृद्ध पारंपारिक संस्कृती आणि वारसा ते प्रतिबिंबित करतात. भारतीय मसाल्यांबाबत  जगभर असलेले जुने आकर्षण आपल्याला पुन्हा निर्माण करायचे आहे. भारत आता दुसऱ्या स्थानावर संतुष्ट राहू शकत  नाही. आपल्याला मसाला उद्योगात जागतिक अग्रणी  बनायचे आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व  सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.  नवी मुंबई येथे 15 ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मसाला परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात गोयल यांच्या हस्ते  2019-2020 आणि 2020-2021 साठी मसाले निर्यात उत्कृष्टता पुरस्कार  प्रदान करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गोयल यांनी निर्यातीत मूल्यवर्धनाद्वारे मसाले उद्योगाचा विस्तार करण्याच्या गरजेवर भर दिला. सध्याची  4 अब्ज डॉलर्स मसाला निर्यात वर्ष 2030 पर्यंत 10 अब्ज डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगातील भागधारकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या बाजारपेठा विस्तारित करण्यासोबत वाढीव मूल्यवृध्दीच्या माध्यमातून नव्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी  सर्वांनी आपली ऊर्जा केंद्रित करून  एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे, असेही   गोयल यांनी सांगितले.  जगभरात मसाल्यांचा वाढत्या वापराला चालना देण्यासाठी  जगभरात पसरलेल्या  35 दशलक्ष भारतीय वंशाच्या लोकांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवावे, असे गोयल यांनी सुचवले.

मसाला उद्योगाला सर्वसमावेशकतेसाठी प्रयत्न करण्याचे  आणि पर्याप्त  उत्पादनासाठी शेतकर्‍यांना पाठबळ मिळेल, याकडे लक्ष पुरवण्याचे आवाहन गोयल यांनी मसाला उद्योगाला केले.  गोयल यांनी भारतीय मसाल्यांसाठी प्रमाणित ब्रँड व्हॅल्यू तयार करण्याच्या महत्त्वावरही भाष्य केले.

जगाच्या इतर भागातून आलेल्या प्रतिनिधींच्या  सहभागामुळे आपल्याला  आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.    यशस्वी व्यवसाय सहकार्याला मूर्त रूप देण्यासोबतच  भारतीय आदरातिथ्याचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी जगभरातून आलेल्या प्रतिनिधींना  केले.

गोयल यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.  यापुढेही ते आपली  उल्लेखनीय कामगिरी, उच्च दर्जा कायम ठेवतील आणि या क्षेत्रात भविष्यात जगभरात भारताची   ओळख प्रस्थापित करण्यासाठी  उच्च मानक  स्थापित करतील, अशी आशा व्यक्त केली.

सात वर्षांच्या कालावधीनंतर  मसाला परिषद  आयोजित केल्याबद्दल गोयल यांनी  मसाले  मंडळाचे अभिनंदन केले आणि वर्ष 2024 मध्ये दिल्ली येथे जागतिक दर्जाचे प्रदर्शन, परिसंवाद आणि परिषद आयोजित करण्याची विनंती  केली.    जगाला भारताची या क्षेत्रातील  क्षमता पाहण्याची संधी मिळावी यासाठी या क्षेत्रातील सर्व उद्योजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याची सूचना गोयल यांनी केली.

गोयल यांनी नमूद केले की, ही परिषद आयोजित करण्यासाठी भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या दरम्यानच्या काळासारखी  चांगली वेळ मिळाली नसती. "भारत - मध्य पूर्व - युरोप आर्थिक कॉरिडॉरचा शुभारंभ हा भूतकाळातील मसाल्याच्या  मार्गाप्रमाणेच आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर जागतिक नेत्यांसह सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाकडे आपण आदर्श म्हणून पाहिले पाहिजे. जुन्या मसाले मार्गाचे वैभव परत आणण्याची आपल्यासाठी ही योग्य संधी आहे. भारताचा स्वाद आणि देशाचे वैविध्य  साजरे करण्याची ही नामी संधी आहे. चला जागतिक बाजारपेठा काबीज करूया.उत्सवांशिवाय जसे जीवन अपूर्ण आहे, तसेच मसाल्यांशिवाय भोजन देखील अपूर्ण आहे. मसाल्यांना आपण जगभरातील भोजनाचा एक आवश्यक घटक बनवले पाहिजे. भारतीय मसाल्यांच्या महतीबाबत जगभर बोलले गेले पाहिजे आणि लिहिले गेले पाहिजे. आपल्या आजीच्या बटव्यातील उपाय जगभरात कसे वापरले जाऊ शकतात ते पाहूया. भारताला प्रथम पसंती असलेला मसाल्यांचा स्त्रोत बनवूया आणि संपूर्ण जगाचे कल्पनाविश्व काबिज करु या. जर आपण सर्वांनी एक संघ म्हणून एकत्र काम केले तर आपण वाणिज्य आणि निर्यातीच्या क्षेत्राची लज्जत वाढवू शकतो. आपल्या मसाल्यांच्या जादूने जगाला मोहित करू या आणि ही जादू भावी पिढ्यांसाठी जतन करूया असे आवाहन मंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

याप्रसंगी भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव आणि मसाले मंडळाचे अध्यक्ष अमरदीप सिंग भाटिया, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव आणि परराष्ट्र व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी, मसाला मंडळाचे सचिव डी साथियान, मसाले मंडळाचे संचालक (विपणन) बसिष्ठ नारायण झा, मसाले उद्योग व्यावसायिक, उत्पादक, व्यापारी, प्रक्रियक, निर्यातदार आणि जगभरातील नियामक उपस्थित होते.

उद्घाटन समारंभानंतर 'स्पाईस रिव्होल्यूशन - प्रमोटिंग व्हॅल्यू ॲडिशन इन ग्लोबल स्पाईसेस ट्रेड' या पुस्तकाच्या प्रकाशनासह, विविध उत्पादनांचा प्रारंभ, व्यावसायिक चर्चा आणि तांत्रिक चर्चांची सत्रे झाली. या कार्यक्रमाने विविध कंपन्यांना मसाला उद्योगाशी संबंधित नाविन्यपूर्ण उत्पादने, ब्रँड आणि सेवांवर प्रकाश टाकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता पाहुण्यांसाठी मनोरंजक अनुभव ठरणाऱ्या कुकरी शोने झाली. परिषदेच्या 14 व्या आवृत्तीमध्ये धोरणकर्ते, नियामक संस्था, मसाले व्यापार संघटना, सरकारी प्रतिनिधी आणि विविध राष्ट्रांतील तांत्रिक तज्ञ यासारख्या विविध सहभागींना एकत्र येण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात भारत आणि जगभरातून 1000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. जगभरातील मसाल्यांच्या व्यापारातील समस्या आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी हे सहभागी एकत्र आले आहेत.

 

वर्ल्ड स्पाइस काँग्रेसविषयी:

डब्ल्यूएससी’ – वर्ल्ड स्पाइस काँग्रेस हाजागतिक मसाला उद्योगामध्‍ये  कार्यरत असणारा मंच आहे. गेल्या तीन दशकांपासून  मसाले या क्षेत्रातील आव्हाने  आणि संबंधित गोष्‍टींवर  विचार विनिमय  करण्यासाठी डब्ल्यूएससी’  हे सर्वात योग्य व्यासपीठ बनले आहे. भारत सरकार, मसाले मंडळ, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालययांच्या  नेतृत्वाखाली विविध व्यापार आणि निर्यात मंचांच्या पाठिंब्याने वर्ल्ड स्पाइस काँग्रेसचे आयोजन करण्‍यात आले आहे.  या क्षेत्राला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी यामुळे मिळत आहे. व्यापार, शाश्वतता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा उपक्रम, या क्षेत्रातील ताज्या  घडामोडी, आव्हाने  आणि भविष्यातील शक्यता यावर उद्योगातील प्रमुख,उत्पादक, व्यापारी, प्रक्रिया करणारे उद्योजक, निर्यातदार आणि जगभरातील नियामकांद्वारे या परिषदेत तपशीलवार चर्चा केली जाते.

 

भारतीय मसाला मंडळाविषयी

भारतीय मसाल्यांचा जागतिक स्तरावर विकास आणि प्रोत्साहन यासाठी मसाले मंडळ  (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, केंद्र सरकार ) ही संस्था कार्यरत आहे.

***

N.Chitale/S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958032) Visitor Counter : 149


Read this release in: English , Urdu , Hindi