आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आग्रा इथे  आरोग्य राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत घेतली अवयवदानाची शपथ


अवयव दानासारखी मानवजातीची दुसरी मोठी सेवा असू शकत नाही : डॉ मनसुख मांडविया

"जिवंतपणी करा रक्तदान आणि मृत्यूनंतर अवयव दान"

Posted On: 16 SEP 2023 3:19PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आग्रा येथील जीआयसी मैदानात आरोग्य राज्यमंत्री प्रो. एस.पी. सिंह बघेल यांच्या उपस्थितीत अवयवदानाची शपथ घेतली. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री ब्रजेश पाठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी आग्रा येथे सुमारे 8,000 लोकांनी अवयव दान करण्याची शपथ घेतली.

"दुसऱ्याला जीवनदान देण्यासाठी अवयवदानाप्रमाणे मानवजातीची दुसरी  मोठी सेवा असू शकत नाही" असे ते यावेळी म्हणाले. "जिवंत असताना करा रक्तदान आणि मृत्यूनंतर अवयव दान" असे  आवाहनही त्यांनी केले.

अवयव प्रत्यारोपणानंतर नियमित औषधे आणि तपासण्यांची गरज अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, "अवयव प्रत्यारोपण करणार्‍या सर्व गरीब लोकांना प्रति महिना 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे".  त्यांच्या नियमित तपासणीसाठीही व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 2024 च्या अखेरीस देशातील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव संकलित करण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

आग्रा येथील सरोजिनी नायडू वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉक आणि अवयव दान नोंदणी केन्द्राचे उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले. अवयव दानाची नोंदणी करण्यासाठी, फक्त आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.  आग्रा येथे 23 एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि 87 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिटची पायाभरणीही त्यांनी यावेळी  केली.

लोकांचे प्राण वाचवण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व प्रा.एस.पी.सिंह बघेल यांनी अधोरेखित केले. देशात केवळ 2% लोकांनाच अवयव प्रत्यारोपणाची संधी मिळू शकते याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील अवयव दान करण्याची शपथ घेतल्याचे सांगत प्रत्येकाने तसे करण्याचे आवाहन बघेल यांनी केले.

आवश्यक त्या आरोग्य सुविधा लोकांपर्यंत शंभर टक्के पोहोचवता याव्यात म्हणून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 'सेवा पंधरवडा' सुरू करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  13 सप्टेंबर, 2023 रोजी  'आयुष्मान भव' मोहिमेचे उद्घाटन केले. संपूर्ण देशभरात आरोग्यसेवेची सुलभता आणि सर्वसमावेशकता नव्याने साध्य  करण्याच्या उद्दिष्टाची अंमलबजावणी सेवा पंधरवड्यातकेली जाईल. यात संपूर्ण राष्ट्र आणि संपूर्ण समाजाचा दृष्टिकोन अंतर्भूत आहे. प्रत्येक गाव तसेच शहरी प्रभागांमध्ये सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहचवणे,   भौगोलिक अडथळे पार करणे आणि कोणीही वंचित राहणार नाही याची खातरजमा करणे हे सेवा पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1958015) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil