रेल्वे मंत्रालय
रेल्वेचे गती शक्ती विश्वविद्यालय वडोदरा आणि एअरबस यांच्यात एअरोस्पेस शिक्षण आणि संशोधनासाठी सामंजस्य करार
“या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासाठी सज्ज राहता येईल”- अश्विनी वैष्णव
यामुळे, एअरबस मध्ये विद्यार्थ्यांसाठी 15000 रोजगाराच्या संधी
सामंजस्य करारामुळे उद्योगक्षेत्र आणि शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय निर्माण होऊन, नवीन शैक्षणिक धोरण अधिक बळकट होईल
Posted On:
07 SEP 2023 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2023
भारतीय रेल्वेचे वडोदरा इथले गती शक्ती विश्वविद्यालय (जीएसव्ही ) आणि एअरबस यांच्यात आज, भारतीय हवाई क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी, एक सामंजस्य करार करण्यात आला. नवी दिल्लीत रेल भवन इथे आज ह्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच दळणवळण मंत्री, तसेच गती शक्ती विश्वविद्यालयाचे पहिले कुलगुरू, अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
एअरबस आणि टाटा यांनी अलीकडेच, गुजरातमधील वडोदरा इथे सी-295 एअरक्राफ्ट बनवण्याची संरचना, नवोन्मेष, निर्मिती, उत्पादन आणि विकास करण्यासाठी ही भागीदारी जाहीर केली आहे. एअरबस ही व्यावसायिक विमाने बनवणारी जगातील सर्वात मोठी तसेच हेलिकॉप्टर्स, संरक्षण आणि अवकाश उपकरणे निर्माण करणारी आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचे भारताशी दीर्घकालीन संबंध आहेत. ही कंपनी भारताकडे जागतिक स्तरावरील व्यावसायिक विमान क्षेत्र आणि अत्यंत प्रतिभा आणि संसाधन केंद्र म्हणून बघते आहे. देशात संपूर्णपणे एकात्मिक विमान निर्मिती व्यवसाय व्यवस्था विकसित करण्यासाठी आवश्यक त्या प्राथमिक उभारणीसाठी कंपनी वचनबद्ध आहे.मेक इन इंडिया हे तत्व एअरबसच्या व्यावसायिक धोरणाचा गाभा आहे आणि ही कंपनी, जागतिक उत्पादन क्षेत्रात हळूहळू देशाचे योगदान वाढवत आहे.
यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “गती शक्ती विश्वविद्यालय उद्योग-शैक्षणिक भागीदारीवर लक्ष केंद्रित करेल. या विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम उद्योगांच्या सहकार्याने तयार केले जातील, जेणेकरून जीएसव्हीमध्ये शिकणारे विद्यार्थी उद्योग क्षेत्रासाठी सज्ज होतील. त्यामुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील रोजगारासाठी त्यांना मागणी असेल. एअरबससोबतचा आजचा सामंजस्य करार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.”
एअरबस इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलर्ड यांनी सांगितलं, “भारतातील विमान निर्मिती व्यवस्था विकसित करण्यासाठी वचनबद्ध असलेली कंपनी म्हणून, मनुष्यबळ विकासामध्ये गुंतवणूक करण्याची आमची जबाबदारी आहे. गती शक्ती विद्यापीठासोबतची भागीदारी देशातील कुशल कामगारांची एक मजबूत साखळी विकसित करेल जी भविष्यात वेगाने वाढणाऱ्या एरोस्पेस क्षेत्राला सेवा देण्यासाठी सज्ज असेल.”
ह्या उद्योग- शैक्षणिक भागीदारीमुळे,नियमित विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी क्षेत्र-विषयक कौशल्य अभ्यासक्रम आणि कार्यक्रम, सह-विकसित आणि सह-अंमलबजावणी करणे शक्य होईल. तसेच, सह संशोधन आणि उद्योगाचा अनुभव, विद्यार्थ्यांना देणे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि प्लेसमेंट आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम तयार केले जाऊ शकतील. यामुळे, उद्योगांच्या गरजेनुसार, विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. एअरबस इंडियन ऑपरेशन्स मध्ये 15000 विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
एक उद्योग-प्रणित आणि नवोन्मेष-नेतृत्व विद्यापीठ म्हणून, जीएसव्हीने जगभरातील आघाडीच्या संस्था आणि उद्योगांसोबत आधीही अनेक सहकार्य करार केले आहेत.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955481)
Visitor Counter : 257