वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फेब्रुवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे जागतिक दर्जाच्या वस्त्रांचे प्रदर्शन, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वस्त्रोद्योग होणार सहभागी: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल


पंतप्रधानांचा वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीचा 5 एफ दृष्टीकोन देशातील महिला पुढाकार घेूवन त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करतील -पीयूष गोयल यांचा एशियाटेक्स-2023 मध्ये विश्वास

Posted On: 01 SEP 2023 10:05PM by PIB Mumbai

मुंबई, 1 सप्टेंबर 2023

केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील भागधारकांना आवाहन  केले आहे की, त्यांनी या क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि तरुण पिढीला या उद्योगाशी जोडण्याच्या दिशेने काम करावे. देशाच्या महिला पंतप्रधानांचा '5F' दृष्टीकोन पुढे नेऊ शकतात आणि त्याची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करू शकतात, असे त्यांनी आज मुंबईत सांगितले. '5F' सूत्र म्हणजेच, Farm to fibre, अर्थात शेत ते सूत, fibre to factory- सूत ते कारखाना, factory to fashion- कारखाना ते फॅशन, fashion to foreign- फॅशन ते परदेश. हा एकात्मिक दृष्टीकोन, अर्थव्यवस्थेमधील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी उपयोगी ठरेल. केंद्रीय मंत्री मुंबईमध्ये बीकेसी येथे हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या तीन दिवसीय प्रीमियर बी2बी टेक्सटाईल ट्रेड फेअर एशियाटेक्स-2023 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली की, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे जागतिक दर्जाचे मोठे कापड प्रदर्शन आयोजित केले जाईल, ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापड उद्योग सहभागी होतील.

व्यापार जोडणी वाढवणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व उद्योग हितधारकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, कापड उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर असून त्याच्याकडे बरीच क्षमता आहे. गुणवत्ता आणि किमती बाबत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही कंपनीशी स्पर्धा करण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.

मंत्री पुढे म्हणाले की, जग भारताची प्रगती जाणत आहे आणि जगाच्या प्रत्येक भागाला भारतासोबत सहयोग करायचा आहे. शेती पाठोपाठ वस्त्रोद्योग क्षेत्र ही आपली ताकद आहे, असेही मंत्री म्हणाले. उद्योगात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीने काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय वस्त्रोद्योग 100 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे उद्दिष्ट सहज गाठू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री म्हणाले, केंद्र सरकार तांत्रिक वस्त्रोद्योगात गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहे. या क्षेत्रातील संशोधन आणि नवीन कल्पनांना चालना देण्यासाठी तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान सुरू करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रशिक्षण देण्याच्या दिशेनेही सरकार प्रयत्नशील आहे. जागतिक वस्त्रोद्योग मूल्य शृंखलेतील जवळपास दोन तृतीयांश भाग तांत्रिक वस्त्र आणि मानवनिर्मित धाग्यांच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे पीयूष गोयल यांनी नमूद केले.

विविध क्षेत्रांतील खरेदीदारांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून पुरवठादारांसाठी प्रभावी नेटवर्किंग संधी निर्माण करून वस्त्रोद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी ASIATEX- 2023 चे आयोजन हिंदुस्थान चेंबर ऑफ कॉमर्सने केले आहे.

 

 

 

 

S.Bedekar/R.Agashe/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1954234) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Hindi