अंतराळ विभाग
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत ठरला जगातील पहिला देश
इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावतरण होण्याच्या क्षणाचा महाराष्ट्रातील नागरिकांनी एकत्र येत घेतला आनंद
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इस्रोच्या पथकासोबत झाले होते सहभागी
Posted On:
24 AUG 2023 4:09PM by PIB Mumbai
मुंबई, 24 ऑगस्ट 2023
चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे अवतरण होण्याच्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इस्रोच्या पथकासोबत सहभागी झाले असतानाच, महाराष्ट्राच्या सर्व भागातील नागरिक देखील श्वास रोखून इस्रोकडून होणारे या घटनेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एकत्र जमले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अत्यंत अलगदपणे उतरण्यात यशस्वी झाल्यामुळे भारताने ऐतिहासिक झेप घेण्यात यश मिळवले आहे.
मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राने चांद्रयान-3 च्या चंद्रावतरणाचे क्षण साजरे करण्यासाठी कार्यक्रमांची मालिकाच आयोजित केली होती. या विज्ञान केंद्रातील कार्यक्रमांची सुरुवात विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेने झाली, या कार्यशाळेत कागदापासून चांद्रयान-3 चा नमुना तयार करण्याच्या गुंतागुंतीच्या कलेवर भर देण्यात आला होता. सर्वांना गुंगवून टाकणाऱ्या या सत्रानंतर, विज्ञान केंद्राने चांद्रयान-3 अभियानाविषयी तपशीलवार माहिती देण्यासाठी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील माजी वैज्ञानिक प्रा.मयंक एन, वाहिया यांनी या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधून त्यांना या विषयाशी संबधित ज्ञान आणि अमूल्य माहिती देऊन अनुभवाने समृध्द केले. कार्यक्रमाच्या शेवटी, 400 हून अधिक लोकांनी नेहरू विज्ञान केंद्राच्या सभागृहात सादर झालेल्या चांद्रयान-3 च्या चंद्रावतरणाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद लुटला.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने(एनएफडीसी) ही घटना साजरी करण्यासाठी भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयात (एनएमआयसी) चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या अलगद उतरण्याच्या घटनेचे थेट प्रक्षेपण सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक उपस्थित होते. या घटनेचे थेट प्रक्षेपण सादर करण्याच्या उपक्रमाविषयी बोलताना एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार म्हणाले, “या अविस्मरणीयप्रसंगाचे साक्षीदार झाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आहे.केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी, विशेष करून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही फार महत्त्वाची घटना आहे.” एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी.रामकृष्णन म्हणाले, “मी संपूर्ण देशाचे आणि ही मोहीम यशस्वी करण्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन करतो. हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी, एनएमआयसी आणि एनएफडीसी इस्रोचे आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करत आहे.”या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाला मोठ्या पडद्यावर ही ऐतिहासिक घटना पाहायला मिळाल्याबद्दल अत्यानंद झाला.
पुण्यामध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या मोठ्या पडद्यावर हा क्षण पाहण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यांनी केलेल्या टाळ्यांच्या गजराने आणि भारत माता की जय च्या जयघोषाने अवघे सभागृह दुमदुमले. भारत हा चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला, या गोष्टीचा आनंद आणि अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.
पुण्यामधील आयुका (IUCAA) येथे चांद्रयान 3 लँडिंगच्या (अवतरण) थेट प्रक्षेपणासह, एम. सी. उत्तम (संचालक, इस्रो-यूओपी स्पेस टेक्नॉलॉजी सेल, एसबीपीयू) यांचे 'इस्रोचा साउंडिंग रॉकेट्स ते चांद्रयान मोहिमेपर्यंतचा प्रवास', या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
केंद्रीय दूरसंचार केंद्र, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी हा क्षण साजरा करण्यासाठी पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये सेल्फी बूथ उभारला होता. अनेकांनी ही संधी घेत, या ठिकाणी स्वतःची छायाचित्रे घेतली.
नागपूरमध्ये, रामन विज्ञान केंद्र आणि तारांगण येथे डॉ. जी. श्रीनिवासन, वैज्ञानिक-अभियंता, प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर (सेंट्रल), इस्रो, नागपूर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यानंतर एसओएस सभागृहात प्रज्ञान रोव्हर मॉडेलचे प्रात्यक्षिक आणि चंद्राच्या खास वैशिष्ट्यांवरील कार्यक्रम सादर करण्यात आला, आणि सर्वात शेवटी चांद्रयान 3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.
विविध संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना ही कामगिरी देशासाठी किती महत्वाची आहे, ते समजले, आणि इस्त्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांबरोबर चांद्रयान 3 च्या लँडिंगचे साक्षीदार होता आले.
N.Chitale/Sanjana/Rajashree/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1951704)
Visitor Counter : 86