रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
महाराष्ट्रातील बुलडाणा येथील मलकापूर येथे राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 800 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरीकरणाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
Posted On:
18 AUG 2023 5:54PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे 800 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग 53 वरील नांदुरा ते चिखली या 45 किमी लांबीच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षाताई खडसे, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 45 किमी लांबीच्या चौपदरीकरण प्रकल्पाच्या लोकार्पणामुळे बुलडाणावासीयांच्या प्रगतीला आणि समृद्धीला चालना मिळणार आहे.
भारतमाला योजनेंतर्गत अमरावती-चिखली विभाग संकुल-4 राष्ट्रीय महामार्ग 53 वरील चौपदरीकरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.या प्रकल्पात 6 किमी लांबीचा नांदुरा ग्रीनफिल्ड बाह्यवळण रस्ता, मलकापूर उड्डाणपूल, 4 मोठे पूल, 18 छोटे पूल, 11 जलवाहक पूल, 3 वर्तुळाकार अंडरपास, 4 पादचारी अंडरपास, 11.53 किमी लांबीचा दुहेरी मार्ग सेवा रस्ता, 20 बस निवारा आणि 1 ट्रक ले-बाय यांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशा या चार राज्यांमधील परस्पर व्यापाराला चालना मिळणार आहे. पूर्व-पश्चिम मार्गिकेला चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून याचा फायदा रायपूर, नागपूर आणि सुरतला होईल.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगावचे गजानन महाराज मंदिर, नांदुरा येथील हनुमान मंदिर, लोणार सरोवर यांसारख्या प्रेक्षणीय स्थळांवर सहज जाता येणार आहे. बुलडाणा ते नागपूर जिल्हा आणि बुलडाणा ते धुळे, सुरत या प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. कापूस, लाल मिरची, फळे, धान्ये आणि इतर शेतमालाची वाहतूक जलद होईल ज्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल.नांदुरा येथील बाह्यवळण रस्त्यामुळे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
अमृत सरोवर योजनेंतर्गत या महामार्गाच्या बांधकामात तलावांच्या खोलीकरणातून मिळालेल्या मातीचा वापर केल्यामुळे परिसरातील तलावांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे.या जलसंधारणामुळे मलकापूरच्या नागरिकांचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील 866 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित कामांची घोषणा आजच्या कार्यक्रमात करण्यात आली.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950233)
Visitor Counter : 157