माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय चित्रपटसृष्टी आणि सिनेरसिकांविषयी आदर व्यक्त करणाऱ्या कलाकृतीची स्थापना करून राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाने भारताचा स्वातंत्र्य दिन केला साजरा


अभिनेत्री अमृता राव आणि आरजे (रेडिओ जॉकी) अनमोल विशेष अतिथी म्हणून उपस्थित

Posted On: 15 AUG 2023 9:35PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्ट 2023 

 

संपूर्ण देश आज मोठ्या उत्साहानं ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे असताना, राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयानेही [National Museum of Indian Cinema (NMIC - एनएमआयसी)]अनोख्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करत या देशभक्तीमय वातावरणात भर घातली. स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात एका प्रेक्षणीय कलाकृतीची स्थापना करण्यात आली. या कलाकृतीच्या अनावरणाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला अभिनेत्री अमृता राव आणि आरजे (रेडिओ जॉकी) अनमोल यांच्यासह, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे [National Film Development Corporation (NFDC - एनएफडीसी)] वरिष्ठ अधिकारी आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (censor board - सेन्सॉर बोर्ड) मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर भाकर हे देखील  उपस्थित होते.

‘लिव्हिंग सिनेमा : रिफ्लेक्शन्स ऑफ सोसायटी’  असे या कलाकृतीचे नामकरण केले आहे. या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास तसेच सिनेरसिकांच्या आयुष्याचा वेध घेतला गेला आहे. प्रत्येक माणसाचे आयुष्य हा एकप्रकारचा सिनेमॅटिक प्रवास असतो, आणि प्रत्येकाकडेच सांगण्यासाठी काही ना काही तरी एक कथाही असतेच,  अशी कल्पना या कलाकृतीच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडण्यात आली आहे.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ एक संस्था म्हणून भारतीय सिनेमाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय ही संस्था म्हणजे एका अर्थाने सरकारच्या बाजुने भारतीय सिनेमाच्या संवर्धनासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची ध्वजवाहक संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. या संस्थेच्या माध्यमातून अगदी भारतात बनलेल्या पहिल्या चित्रपटापासून भारतीय चित्रपटांचा आजवरचा संपूर्ण प्रवासाचे संकलन केले गेले असल्याचे शब्दांत त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

या पार्श्वभूमीवर संस्थेच्या संग्रहालयात तिथल्या प्रांगणात स्थापन केलेल्या कलाकृतीची भर पडली असून, ही कलाकृती म्हणजे राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या, भारतीय सिनेमाच्या गौरवशाली वारशाचे जतन आणि साजरीकरणाचेच प्रतिक ठरली असल्याचं मतही कुमार यांनी व्यक्त केलं. सर्व चित्रपटरसिकांनी हे संग्रहालय आणि कलाकृती पाहण्यासाठी यावं असं खुलं आमंत्रणही कुमार यांनी यावेळी दिलं.

या कलाकृतीच्या अनावरणानंतर, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली म्हणून 'द लिजेंड ऑफ भगतसिंग' या चित्रपटाचा खेळही दाखवला गेला.  प्रदर्शन करण्यात आले. अभिनेत्री अमृता राव यांनीही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती, त्या देखील या खेळासाठी उपस्थित होत्या. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि बटुकेश्वर दत्त हे खरे खुरे लोहपुरुष होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज इथे उपस्थित राहु शकलो आहोत, अशा शब्दांत अमृता राव यांनी या स्वातंत्र्यवीरांबद्दलच्या आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात आज स्थापन केलेली कलाकृती प्रेक्षकांना काहीतरी अभिनव पाहिल्याचा अनुभव देते, ही नयनरम्य कलाकृती असून, त्यातून विविध वयोगटांतल्या व्यक्तींना, कोणताही सिनेमा आपापल्या स्वतःच्या चष्म्यातूनही पाहता येतो हा विचार मिळतो असेही राव यावेळी म्हणाल्या. या खास कार्यक्रमासाठी आपल्याला तसेच अनमोल यांना आमंत्रित केल्याबद्दल राव यांनी राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय व्यवस्थपनाचे आभारही मानले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिथयश मान्यवरांच्या आशयघन मुलाखतींसाठी ओळखले जाणारे आरजे (रेडिओ जॉकी) अनमोल यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. ही कलाकृती म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीला आज जागतिक स्तरावर जी ओळख मिळाली आहे, ती मिळवून देण्यात योगदान दिलेल्या प्रत्येकासाठीची आदरांजली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सिनेमाच्या आपल्या आवडीविषयीचे अनुभवही अनमोल यांनी यावेळी सांगीतले. आपण लहानपणी मनोज कुमार यांची भूमिका असलेला 'शहीद' हा चित्रपट पाहिला होता. या सिनेमामुळेच आपल्याला क्रांतिकारक भगतसिंग पहिल्यांदा कळू शकले, आणि तेव्हापासूनच आपण त्यांच्याकडे आयुष्यातले आदर्श म्हणून पाहात आल्याचे त्यांनी सांगितले. आज कोणत्याही मुलाने 'द लिजेंड ऑफ भगतसिंग' हा चित्रपट पाहिला तर त्यांच्याही मनात आपल्यासारखीच भावना  निर्माण होईल  अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयातील समृद्ध वारसा पाहून आपण भारावून गेल्याची भावनाही अनमोल यांनी व्यक्त केली. आपल्याला सिनेमाची आवड असेल, आणि काहीएका मार्गाने आपल्याला चित्रपटसृष्टीचेच एक घटक असल्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी सगळ्यांनीच राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला आवर्जून भेट द्यायला हवी असे आवाहन त्यांनी केले. हे संग्रहालय म्हणजे एक असे मंदीर आहे की जिथे आपल्याला गेल्या ११० वर्षांमधली भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास आणि प्रगती समजून घेता येईल अशा शब्दांत त्यांनी संग्रहालयाचे महत्वही अधोरेखीत केले.

या कार्यक्रमासाठी 250 पेक्षा जास्त उत्साही सिनेरसिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना, मार्गदर्शकाच्या सोबतीने भारतीय सिनेमाचा उदय आणि प्रवास उलगडून दाखवणाऱ्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या वास्तुची सफरही घडवण्‍यात आली .

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1949201) Visitor Counter : 59


Read this release in: English