सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी ग्रामोद्योग केंद्रात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतीक बनले – खादी ग्रामोद्योग अध्यक्ष
खादीच्या उलाढालीमध्ये 9 वर्षात तीस हजार कोटींवरून 1 लाख तीस हजार कोटींपर्यंत वाढ
Posted On:
15 AUG 2023 5:35PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2023
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आज मोठ्या उत्साहात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केवीआयसीच्या मुख्यालयात झेंडावंदन केले. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली, मुंबईत तिरंगा रॅली देखील काढण्यात आली.
हा तिरंगा केवळ एक कापडाचा तुकडा नाही, तर स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या, कार्य करणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात लोकांच्या त्यागाचे, संघर्षाचे आणि स्वप्नाचे प्रतीक आहे, अशा भावना मनोज कुमार यांनी व्यक्त केला. त्यांनी पाहिलेले बलशाली भारताचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होत आहे, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी मनोज कुमार यांनी खादीचा अभिमानास्पद इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील खादीचे योगदान सांगितले. हीच खादी आता ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे ते म्हणाले. खादी आजही, दारिद्र्य निर्मूलन, कारागीर सक्षमीकरण आणि रोजगाराचे महत्वाचे साधन ठरली आहे. पंतप्रधानांनी गेल्या नऊ वर्षात खादीला केवळ एक वस्त्र म्हणून मर्यादित न ठेवता,विकासाचे साधन बनवले आहे, असं मनोज कुमार म्हणाले. खादी स्वदेशीच्या अभिमानाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते, याचे स्मरण करत, देशाच्या आर्थिकप्रगतीत खाडी ग्रामोद्योगांचे असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या नऊ वर्षात, खादी ग्रामोद्योगाचा व्यापार एक 30 हजार कोटी रुपयांवरुन, एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आणि हा पैसा देशातील गोरगरीब कारागीर, महिलांपर्यंत पोहोचल्यामुळे, त्यांना दारिद्र्य रेषेतून बाहेर पडण्यास मदत झाली आहे, असं ते म्हणाले. खादी विणकरांना मिळणाऱ्या मजुरीतही मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच गेल्या नऊ वर्षात खादी वस्त्राच्या उत्पादनात, 260 टक्क्यांची अभूतपूर्व वाढ झाली आहे, तसेच विक्रीत 450 टक्क्यांची वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितले. या नऊ वर्षात, खादीमुळे 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
खादी अधिक लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था- एनआयएफटी च्या मदतीने काही योजना आखल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यात पहिल्यांदाच खादी डेनिम तयार करण्यात आला आहे. तसेच माणिपूरच्या कारागिरांनी तयार केलेल्या लोटस सिल्कपासून बनलेली वस्त्रे लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोगाचे सदस्य शिरीष केदारे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, आर्थिक सल्लागार पंकज बोडखे, मुख्य दक्षता अधिकारी डॉ.संघमित्रा, सह मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नारायण व मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | S.Bedekar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949114)
Visitor Counter : 131