संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सँडहर्स्ट अकादमी येथे होणाऱ्या 201 व्या सॉव्हरिन परेडला उपस्थित राहण्यासाठी संरक्षण दलांचे प्रमुख जनरल मनोज पांडे, इंग्लडसाठी रवाना

Posted On: 09 AUG 2023 9:00AM by PIB Mumbai

प्रतिष्ठीत सँडहर्स्ट अकादमीच्या 223 व्या दीक्षांत सोहळ्यात 201 व्या सॉव्हरिन परेडला, सॉव्हरिनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहाण्यासाठी संरक्षण दलांचे प्रमुख जनरल मनोज पांडे आज इंग्लडसाठी रवाना झाले.

सँडहर्स्ट येथील रॉयल मिलिटरी अकादमीची सॉव्हरिन परेड एक मानाचा  कार्यक्रम आहे. आपल्या गौरवशाली इतिहास आणि जगभरातील लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सज्ज करण्यासाठी तो ओळखला जातो.  या परेडसाठी सॉव्हरिनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे जनरल मनोज पांडे हे भारतातील पहिले संरक्षण दलांचे प्रमुख आहेत.  आपल्या दौऱ्यादरम्यान, रॉयल मिलिटरी अकादमीमध्ये अभिमानाचे स्थान असलेल्या भारतीय लष्कराच्या स्मारक कक्षालाही ते भेट देणार आहेत.

आपल्या इंग्लड दौऱ्यात जनरल मनोज पांडे, ब्रिटीश संरक्षण दलांचे प्रमुख जनरल सर पॅट्रिक सँडर्स आणि इंग्लडच्या सशस्त्र दलाचे उपप्रमुख जनरल ग्वेन जेनकिन्स यांच्याशी संवाद साधतील. इंग्लंडच्या  स्ट्रॅटेजिक कमांडचे कमांडर जनरल सर जेम्स हॉकेनहुल, लेफ्टनंट जनरल राल्फ वुडडिसे, कमांडर फील्ड आर्मी आणि रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्टचे कमांडंट मेजर जनरल जॅचरी रेमंड स्टेनिंग यांच्याशी ते उच्चस्तरीय चर्चा करतील. संरक्षण सहकार्य, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि धोरणात्मक नियोजन अशा परस्पर हिताच्या विविध मुद्यांचा यात समावेश आहे.

उभय देशांमधील राजनैतिक, लष्करी आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.  संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि सामंजस्याला चालना देणार्‍या चिरस्थायी सौहार्दाची तो साक्ष देतो.

जनरल मनोज पांडे यांना मिळालेले विशेष आमंत्रण हे भारत आणि इंग्लड यांच्यातील दीर्घकालीन सहकार्य आणि मैत्रीचे निदर्शकच होय .  सॉव्हरिन परेडमधील जनरल पांडे यांचा सहभाग, हा लष्करी संबंध दृढ करण्याच्या आणि जागतिक स्तरावर शांतता तसेच सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे. परस्पर आदर आणि कौतुकाचे हे एक उत्तम उदाहरण आहे जे भारत-इंग्लड संबंधांचा मजबूत पाया आणखी भक्कम करते.

******

Jaydevi PS/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946959) Visitor Counter : 170