जलशक्ती मंत्रालय
जल जीवन मोहिमेचा सकारात्मक परिणाम
Posted On:
07 AUG 2023 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2023
"जल जीवन मोहिमेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात सुरक्षितपणे व्यवस्थापित पेयजल पुरवठा करण्याच्या व्यवस्थापनात घेतलेल्या पुढाकारामुळे आरोग्यविषयक लाभांच्या क्षमतांचा अंदाज" या विषयावरील डब्लू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात सर्वत्र सुरक्षितपणे व्यवस्थापित पेयजल पुरवठा केल्यास अतिसाराच्या आजारांमुळे होणारे सुमारे 400,000 मृत्यू टाळता येतील. तसेच सुमारे 14 दशलक्ष DALY म्हणजे आजारपणामुळे अपंगत्वाने बाधित होणारी वर्ष टाळता येतील, परिणामी खर्चात अंदाजे 8.2 लाख कोटी रुपयांपर्यंत बचत होईल. असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अहवाल सार्वजनिक डोमेनवर देखील उपलब्ध आहे त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे:
https://jaljeevanmission.gov.in/sites/default/files/2023-06/Jal-Jeevan-Mission-Summary-of-report.pdf
ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना आपला बराचसा वेळ आणि ऊर्जा दैनंदिन वापरासाठीचे पाणी आणण्यात खर्च करावी लागते.परिणामी उत्पन्न कमावण्याच्या संधींमध्ये महिलांचा सहभाग कमी होतो, तर मुलींचा शालेय जीवनातील वेळ वाया जातो शिवाय त्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतात. घराच्या परिसरातच पेयजलाची उपलब्धता निश्चित केल्यास ग्रामीण भागातील लोकांची विशेषतः महिलांचे आरोग्य आणि त्यांचे सामाजिक आर्थिक जीवनमानात सुधारणा होईल आणि ग्रामीण स्त्रिया आणि मुलींचे श्रम कमी होतील. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा झाल्यास पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेत (दररोज 5.5 कोटी तास),विशेषतः महिलांच्या वेळेत बचत होईल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये (एस डी जी) 6.1मध्ये 2030 पर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा सार्वत्रिक आणि न्याय्य पद्धतीने पुरवठा होण्यासाठीचे लक्ष्य निश्चित केले आहे.
भारत सरकारने राज्ये केंद्रशासित प्रदेशांसमवेत भागीदारीच्या तत्वावर जल जीवन मिशनद्वारे राबविण्यात आलेल्या हर घर जल योजनेची अंमलबजावणी केली असून त्याद्वारे 2024 पर्यंत देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. ही मुदत पिण्याच्या पाण्याच्या सेवांसाठी शाश्वत विकास लक्ष्य (एस डी जी) 6.1 ने निश्चित केलेल्या वर्ष 2030 पेक्षा खूप आधीची असून - त्यामुळे एस डी जी 6.1 च्या यशावर सकारात्मक प्रभाव पडतो.
दिनांक 04.08.2023 पर्यंत, देशातील 19.4 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 12.7 कोटी (65.5%) ग्रामीण कुटुंबांसाठी नळाद्वारे पाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ही माहिती जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1946535)
Visitor Counter : 176