Posted On:
06 AUG 2023 2:17PM by PIB Mumbai
अमृत भारत स्थानके पुनर्विकास योजनेचा आज देशव्यापी शुभारंभ झाला. याचाच भाग म्हणून, मुंबईत परळ स्थानकात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी, महाराष्ट्राच्या विकासात रेल्वेचे योगदान अधोरेखित केले. अमृत भारत स्थानके पुनर्विकास ह्या उपक्रमाअंतर्गत, महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करुन, ती अत्याधुनिक केली जाणार असून, त्यात प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, राज्यपाल बैस यांनी राज्यातील पायाभूत सुविधा उभारणीला बळ देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटिबद्धतेबद्दल, कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज आभासी पद्धतीने, देशातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते.
देशात रेल्वे सुरू झाल्यापासून, आजपर्यंत रेल्वे विभागाने दिलेल्या सेवेचा आणि अविरत प्रगतीचा राज्यपालांनी उल्लेख केला. तसेच, प्रवासी आणि मालवाहतुकीच्या क्षेत्रात, रेल्वेचा प्रभावही त्यांनी अधोरेखित केला. रेल्वे प्रवास आज आरामदायी झाला असल्याबद्दल, आनंद व्यक्त करत, आपल्याला स्वतःला रेल्वेनेच प्रवास करायला आवडते, असेही राज्यपालांनी सांगितले. भारतीय रेल्वेला, देशाची जीवनवाहिनी असे म्हटले जाते, हा संदर्भ देत, रेल्वे, भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक असून, देशाच्या विविध भागांना ती एकत्र आणते असे राज्यपाल म्हणाले.
रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित करतांना, ते म्हणाले की हे दीर्घ काळापासून प्रलंबित होते. आता आधुनिक सुविधायुक्त स्थानके, ग्रामीण विकासाला गती देतील, आणि मुंबई सारख्या शहरासाठी देखील, प्रवास सुखकर होण्यात मदत होईल, असे ते म्हणाले. त्याशिवाय, रेल्वेशी संबंधित, ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रो प्रकल्प आणि किनारी मार्ग प्रकल्प अशा सर्व पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार असून, हे एक जागतिक दर्जाचे शहर बनेल, असेही त्यांनी सांगितले.
या स्थानकांच्या पुनर्विकासात, पर्यावरण-पूरक आणि दिव्यांग स्नेही सुविधा निर्माण कराव्यात असे आवाहन राज्यपालांनी केले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्वसमावेशक अमृत भारत स्थानक पुनर्विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 44 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. या उपक्रमात, मुंबईतील विशेषत: परळ, विक्रोळी आणि कांजूरमार्ग या उल्लेखनीय स्थानकांचा समावेश आहे. विशेषत: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाचे व्यापक परिवर्तन केले जाणार असून, त्यासाठी, 21.01 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कांजूरमार्ग येथील कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता राजेश अरोरा, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अखलाद अहमद आणि मुख्य कार्यकारी व्यवस्थापक, मुकुल जैन यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी अनुक्रमे नागपूर आणि जालना रेल्वे स्थानकावर कार्यक्रमांना उपस्थित राहून संबोधित केले.
त्याचवेळी, आकुर्डी आणि पुणे रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमांत, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.राज्यात आमूलाग्र परिवर्तन आणणाऱ्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांवर आयोजित कार्यक्रमांना स्थानिक खासदार, आमदार, स्वातंत्र्यसैनिक आणि मान्यवर उपस्थित होते.
'अमृत भारत स्थानक योजने’त समाविष्ट महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके:
मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी.
सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर
पुणे रेल्वे विभाग - आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव
भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव
नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव.
नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम.
सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor