संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाकडून 6 ऑगस्ट 2023 रोजी दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
Posted On:
04 AUG 2023 8:45PM by PIB Mumbai
मुंबई, 4 ऑगस्ट 2023
भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने दुसऱ्या इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 चे आयोजन करत असल्याची घोषणा केली आहे. निरोगी जीवनशैली आणि दक्षिण मुंबईचा समृद्ध वारसा याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी रविवारी 6 ऑगस्ट 2023 रोजी या हेरिटेज रनचे आयोजन होत आहे. ऐतिहासिक परिसर आणि असाधारण निओ-गॉथिक शैलीचे दर्शन घडवणाऱ्या इमारतींच्या वैशिष्ट्यांसह आकर्षक वास्तुरचनांच्या सौंदर्यासाठी दक्षिण मुंबई वारसा जिल्हा ओळखला जातो. मुंबईतील सर्वाधिक जुन्या वास्तुंपैकी काही वास्तूंचे संरक्षक असलेल्या भारतीय नौदलाला मुंबईच्या या वारशाचे संवर्धन करण्याचा आणि त्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा अतिशय अभिमान आहे. इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेल्या या जिल्ह्यातील वारसास्थळांकडे लक्ष वेधून घेणारा आणि या शहराच्या ऐतिहासिक भूतकाळाशी अधिक जास्त प्रमाणात जोडून घेण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित करणारा आणि नागरिकांमध्ये या वारशाबाबत अभिमानाची आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारा आणि या प्रक्रियेदरम्यान सहभागी आणि प्रेक्षक यांना सारख्याच प्रमाणात अविस्मरणीय अनुभव देणारा एक मंच आहे.
13 ऑगस्ट 2022 रोजी इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रनचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ऐतिहासिक वारसा आणि तंदुरुस्ती प्रेमी यांनी सारख्या प्रमाणात एकत्र सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आणि त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली होती. या रनमध्ये सहभागींना धावण्याच्या मार्गावर 37 वारसा स्थळांचे अवलोकन करण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. शहराचा मानबिंदू असलेल्या गेटवे ऑफ इंडियाजवळ या दौडीचा समारोप झाला, ज्या ठिकाणी जमा झालेल्या सहभागींनी मुंबईचा अभिमान असलेल्या या वास्तूच्या परिसराच्या सौंदर्याचा आनंद घेतला आणि त्याची प्रशंसा केली.
इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 साठी यंदा 6500 धावपटूंनी नोंदणी केली आहे. ही दौड 10 किमीच्या 'वरुण रन' आणि 5 किमीच्या 'समुद्र रन' या दोन वेगवेगळ्या अंतरांच्या श्रेणींमध्ये आयोजित होणार आहे. अतिशय काळजीपूर्वक रचना करण्यात आलेल्या या दौडीच्या मार्गावर सहभागींना या ऐतिहासिक स्थळांदरम्यान दक्षिण मुंबईतील अद्भुत वास्तुरचना आणि सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडणार आहे. सर्व धावपटूंची सुरक्षा आणि त्यांचा आनंद सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाने व्यावसायिक शर्यत व्यवस्थापन भागीदार, अनुभवी वैद्यकीय पथके आणि स्वयंसेवकांची मदत घेतली असून त्यांना या दौडीच्या मार्गावर जागोजागी सहभागींना मदत करण्यासाठी त्याचबरोबर प्रोत्साहन देण्यासाठी तैनात केले जाणार आहे. या भागीदारींमधून मुंबईची भावना आणि शहराच्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न अधोरेखित होत आहेत.
चला तर मग यामध्ये सहभागी व्हा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्या.
अधिक माहितीसाठी, कृपया https://indiannavymumbaiheritagerun.com येथे भेट द्या.
तारीख: रविवार, 06 ऑगस्ट 2023
स्थळ: बॅलॉर्ड पियर, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र 400001
* * *
PIB Mumbai | S.Kakade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945940)
Visitor Counter : 99