शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी गोवाचा चौथा दीक्षांत सोहळा आणि 8 वा स्थापना दिवस साजरा

Posted On: 02 AUG 2023 2:14PM by PIB Mumbai

गोवा | ऑगस्ट 2, 2023

गोव्यातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी) चौथा दीक्षांत सोहळा 30 जुलै 2023 रोजी राजभवन येथील दरबार हॉलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने उपस्थिती होती.

पदवीदान समारंभात बी.टेकचे 142 विद्यार्थी, एम.टेक 23 विद्यार्थी आणि 3 एमएस विद्यार्थ्यांसह 171 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले आणि संस्थेने घालून दिलेला उत्कृष्टता, बांधिलकी आणि उत्साहाचा वारसा पुढे नेण्यास सांगितले.

गोव्याच्या परिवर्तनात, विशेषत: सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात आयआयटी गोवा महत्त्वाची भूमिका बजावू शकते यावर राज्यपालांनी भर दिला. गोव्याच्या अद्वितीय सामर्थ्य आणि गरजांशी सुसंगत संशोधन आणि विकासाची विशेष क्षेत्रे ओळखण्याच्या दिवंगत डॉ. मनोहर पर्रीकर यांच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी आयआयटीच्या समर्पणावर राज्यपाल बोलले. राष्ट्रीय शिक्षण धोरण, 'ब्लू इकॉनॉमी' आणि 'डीप ओशन' उपक्रम यासारख्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी संस्थेच्या उपक्रमांची सांगड घातल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

आयआयटी गोवाच्या स्थायी जागेसाठी राज्य सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करावे, असे राज्यपाल म्हणाले. संस्थेच्या सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावाने कार्य करण्यासाठी स्थायी संकूल महत्त्वाचे आहे.

यावेळी आयआयटी गोवाचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांनी 2021-22 या वर्षाचा अहवाल सादर केला. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि वीजपुरवठा यासारख्या अडचणींना सामोरे जात असतानाही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, तसेच संशोधनात उत्कृष्टतेसाठी संस्थेच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. जागतिक प्रगती आणि समाजकल्याणात योगदान देताना नावीन्यपूर्ण गोष्टींमध्ये अग्रेसर राहण्यासाठी आयआयटीच्या निरंतर प्रयत्नांचे प्रदर्शन या अहवालात करण्यात आले आहे. डॉ. मिश्रा यांनी प्लेसमेंटची उत्साहवर्धक आकडेवारीही यावेळी सांगितली आणि सांगितले की, मंदीच्या काळातही प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या बीटेक आणि एमटेकच्या 97.6% विद्यार्थ्यांना आकर्षक ऑफर मिळाल्या. सर्वाधिक पॅकेज 60 लाख रुपयांचे होते आणि बी.टेक च्या विद्यार्थ्यांसाठी सरासरी पॅकेज 17.19 लाख आणि एम.टेक च्या विद्यार्थ्यांसाठी 10.68 लाख होते. हे प्रभावी आकडे आयआयटी गोवाद्वारे प्रदान केलेल्या शिक्षणाचा दर्जा आणि संधींचा पुरावा आहेत.

पदवीदान समारंभाला संचालक मंडळाचे सदस्य, सिनेट, पदवीधर विद्यार्थ्यांचे कुटुंबीय तसेच आयआयटी गोवाचे समर्पित प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. 

***

SamarjitT/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1944958) Visitor Counter : 169


Read this release in: English