पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
महाराष्ट्रासह इतर राज्यात पसरलेले अवैध व्याघ्र व्यापार करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त , भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माजी क्षेत्र अधिकाऱ्याला गडचिरोलीत अटक: वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो
Posted On:
01 AUG 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023
संघटित वन्यजीव गुन्हेगारी आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापाराचा सामना करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEF&CC) स्थापन केलेल्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB) या सर्वोच्च संस्थेने 29.07.2023 रोजी सर्व व्याघ्र अभयारण्यांना आणि व्याघ्र अधिवासाच्या क्षेत्रांना या भागात गस्त वाढवण्यासाठी तसेच ही क्षेत्रे शिकारी टोळ्यांपासून वाचवण्यासाठी रेड अलर्ट जारी केला. विश्वासार्ह माहितीच्या आधारावर 28.06.2023 रोजी व्याघ्राजिन आणि हाडे जप्त करण्यात आली होती आणि आसाम वन आणि पोलीस अधिकार्यांनी गुवाहाटी येथे 05 गुन्हेगारांना अटक केली होती. या प्रकरणात अनेक राज्यांचा सहभाग आढळल्याने आसाम वन विभागाने हे प्रकरण तपासासाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो कडे हस्तांतरित केले आहे. WCCB ने गुवाहाटी व्याघ्राजिन आणि हाडे जप्ती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी ची स्थापना केली आहे. जप्त करण्यात आलेले वाघाचे अवयव महाराष्ट्रातील गडचिरोली परिसरातील असल्याचे गुन्हेगारांच्या प्राथमिक चौकशीत दिसून आले. हे प्राथमिक चौकशीचे निष्कर्ष WCCB ने महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सामायिक केले आहेत. WCCB च्या माहितीच्या आधारे गडचिरोली परिसरातून बावरिया समाजातील 10 जणांच्या शिकारी टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाय अडकणारे सापळे आणि वाघाचे अवयवही जप्त करण्यात आले आहेत. गुवाहाटी जप्तीच्या गुन्ह्यातील एका गुन्हेगारालाही गडचिरोली परिसरातून अटक करण्यात आली आहे. गुवाहाटी आणि गडचिरोली येथे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराच्या चौकशीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. द्वारिका येथील मिश्राम जाखड ही व्यक्ती वाघाला काबूत करतो, शिकार करतो आणि व्याघ्र अवयवांचा अवैध व्यापार करतो असे आढळून आले आहे. तो केवळ वाघांच्या अवैध व्यापार व्यवसायसंघाला प्रायोजित करत नाही तर शिकारी, तस्कर यांच्याकडून प्रचंड पैसा उकळतो आणि त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
31.07.2023 रोजी वन्यजीव गुन्हे नियंत्रण कार्यालयाच्या विशेष तपास पथकाच्या (WCCB SIT) अधिकार्यांनी गडचिरोली पथकासह संशयितांच्या जागेवर छापा टाकला. वाघांच्या अवयवांच्या अवैध व्यापाराशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या मिश्राम झाकड याला 14.80 लाख रुपयांच्या रोख रकमेसह अटक करण्यात आली. तपासादरम्यान जाखड याच्याकडून एक ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे त्यावरून त्याने WPSI (वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया) चा क्षेत्र अधिकारी म्हणून काम केले आहे हे स्पष्ट होते. आपण वन विभागाच्या, एनसीटी दिल्ली सरकारच्या वन्यजीव शाखेत काम केले असल्याची कबुली त्याने दिली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या u/s 9/ 39/ 48/ 49A 50/ 51/ 52 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी त्याच्या सहकाऱ्यांसोबत त्याला गडचिरोली येथे नेण्यासाठी दाखल केलेल्या ट्रान्झिट रिमांडवर सुनावणी करताना न्यायालयाने त्याचे वय (81 वर्षे) लक्षात घेऊन त्याला ट्रान्झिट जामीन मंजूर केला आहे. मात्र ज्या तारखेला ज्या वेळेत आरोपीला न्यायालयासमोर आणि तपास अधिकारी यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गुन्हेगार मिश्राम जाखड याचा वाघांची शिकारी आणि तस्करी करणाऱ्या टोळीशी निकटचा संबंध असल्याचा संशय आहे.
वन्यजीव गुन्हे नियंत्रण कार्यालयाचे विशेष तपास पथक महाराष्ट्र वन अधिकार्यांसह, वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या तरतुदींनुसार वाघांची शिकार आणि अवैध व्यापार साखळीची सखोल चौकशी करत आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत सक्त वसुली संचालनालय (ईडी) ला देखील या शिकारीच्या तपासात सहभागी करण्यात येणार आहे.
S.Patil/Vasanti/Shraddha/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944847)
Visitor Counter : 152