शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, घोकंपट्टी न करता विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षणात मदत करणारे: कोल्हापूरच्या नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डी. रवी दामोदर यांनी व्यक्त केले मत


कोल्हापुरातील नवोदय विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्याने आयआयटी जेईई परीक्षेत मिळवले यश

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ ची तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोल्हापुरात पत्रकार परिषदेचे आयोजन

Posted On: 26 JUL 2023 5:50PM by PIB Mumbai

कोल्हापुर, 26 जुलै 2023

 

सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आनंददायी बनवणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे धोरण अभ्यासाची घोकंपट्टी पद्धत बाजूला सारत, अनुभवाच्या आधारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते, असे मत कोल्हापुरातील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डी. रवी दामोदर यांनी आज व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या लवकरच साजऱ्या केल्या जाणाऱ्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शाळांमधून गळतीचे प्रमाण कमी झाले आहे आणि धोरणातील विविध घटकांमुळे विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक अध्ययनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे दामोदर यांनी सांगितले. या धोरणांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थी सहाव्या इयत्तेपासूनच आंतरराष्ट्रीय भाषा शिकत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोल्हापुरातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून जर्मन भाषा शिकवली जात असून या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार्‍या पायाभूत सुविधांचीही माहिती डी. रवी दामोदर यांनी दिली. या पायाभूत सुविधा दिव्यांग विद्यार्थ्यांना NEET, JEE इत्यादी यांसारख्या प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

एनईपी मध्ये समावेशक अध्ययनाची तरतूद असून दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील या उद्देशाने शाळांमध्येच काही विशेष सुविधा पुरवण्यात येतात. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना वावरता येईल अशाप्रकारे इमारतींची रचना करुन आणि विशेष शिक्षकांची व्यवस्था करुन हे शक्य केले आहे .कागल येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या ओंकार साठे-पाटील या दिव्यांग विद्यार्थ्याने प्रतिष्ठित समजली जाणारी आयआयटी प्रवेश परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली. उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रपतींकडून दिला जाणारा बाल श्री पुरस्कार देखील त्याने मिळवला आहे.

 

पुस्तकी शिक्षणाला कौशल्य प्रशिक्षणाची जोड देण्याच्या सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यामध्ये असणाऱ्या कौशल्यांचा सन्मान करण्यात मदत होईल. यामुळे उद्योगांकडून होत असलेली कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण होईल आणि त्यातून औद्योगिक वाढ आणि समग्र आर्थिक विकास साधता येईल असे कोल्हापूर येथील रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा तिसरा वर्धापनदिन येत्या 29 जुलै 2023 रोजी होणार आहे. त्यानिमित्त देशभरात पत्रकार परिषदांची शृंखला आयोजित करण्यात येत आहे. या धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने दिनांक 29 जुलै 2023 रोजी नवी दिल्लीत प्रगती मैदानावर आयटीपीओ येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय शिक्षा समागम या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा तीन दिवसीय कार्यक्रम, केंद्रीय शिक्षण आणि केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता या मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे. या प्रसंगी पंतप्रधान विविध उपक्रमांचा शुभारंभही  करणार आहेत.

एनईपी2020 च्या यशस्वी कामगिरीबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा

 

* * *

PIB Mumbai | MC/R.Aghor/Sanjana/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1942931) Visitor Counter : 120


Read this release in: English