नौवहन मंत्रालय
गोव्यातील रोजगार मेळाव्याच्या 7 व्या सत्रात 30 पेक्षा जास्त व्यक्तींना मिळाली नियुक्ती पत्रे
Posted On:
22 JUL 2023 1:58PM by PIB Mumbai
बंदरे, जलमार्ग, जहाजबांधणी आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज 22 जुलै, 2023 रोजी पणजी मधील एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा येथे, गोव्याच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने आयोजित केलेल्या, रोजगार मेळाव्याच्या 7 व्या सत्रात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्यांना 30 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रांचे वाटप केले.
स्टेट बँक ऑफ इंडिया, टपाल विभाग, कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा योजना, गोवा सीमाशुल्क आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क मंडळ (CBIC) यासारख्या विविध विभाग आणि संस्थांमध्ये नवीन भरती करण्यात आली आहे. भरती झालेल्यांमध्ये गोव्यातील एका व्यक्तीचाही समावेश असून त्या व्यक्तीची नियुक्ती सीबीआयसीमध्ये करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशातील 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवून 'प्रधानमंत्री रोजगार मेळावा' सुरू केला आहे, असे श्रीपाद नाईक यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. मेळाव्याच्या यापूर्वीच्या सत्रांमध्ये सरकारने देशातील अनेक तरुणांना रोजगार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
"शिक्षण पूर्ण करुनही तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. ते नोकरीच्या शोधात भटकत राहतात आणि त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन भारत सरकारने रोजगार मेळावा सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत, बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. या तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार खासगी कंपन्यांची निवड करण्याची संधीही दिली जाते," असेही नाईक यांनी सांगितले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध आहेत. रोजगार मेळावा, हे वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांचे एक पाऊल आहे,” असे ते म्हणाले. मंत्र्यांनी नवीन भरती झालेल्या तरुणांचे अभिनंदन केले आणि पंतप्रधानांचे विकसित भारताच्या निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला गोव्याच्या सीमाशुल्क आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे प्रधान आयुक्त (अपील) व्ही.एन. थेटे आणि गोव्याच्या सीमाशुल्क आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे आयुक्त नवराज गोयल हे देखील उपस्थित होते. देशभरात 44 ठिकाणी आयोजित राष्ट्रस्तरीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात 70,000 पेक्षा जास्त नवीन नियुक्त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
आजचा दिवस केवळ नवनियुक्त तरुणांसाठी स्मरणीय नाही तर संपूर्ण राष्ट्रासाठीही ऐतिहासिक दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी 1947 मध्ये प्रथमच आज अस्तित्वात असलेले भारताच्या तिरंग्याचे स्वरुप संविधान सभेने स्वीकारले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. नवनियुक्त तरुणांना या महत्त्वपूर्ण दिवशी सरकारी सेवेमध्ये सामावून घेणारे नियुक्तीपत्र मिळत आहे, ही खूप प्रेरणादायी बाब आहे. कारण, यातून त्यांना देशाचे नाव पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्याची संधी या तरुणांना मिळत आहे, हे त्यांनी केलेल्या कठोर परिश्रम आणि निश्चयाचे फलित असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी भरती झालेल्या तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे या महत्त्वपूर्ण प्रसंगी अभिनंदन केले.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941741)
Visitor Counter : 84