नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
वितरित अक्षय ऊर्जा शाश्वत विकास उद्दिष्ट 7 - सर्वांसाठी परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा साध्य करण्यात मदत करू शकेल : G20 ऊर्जा संक्रमण कार्यगट बैठकीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम
विकेंद्रित अक्षय ऊर्जा न्याय्य आणि सर्वसमावेशक जागतिक ऊर्जा संक्रमणाच्या केंद्रस्थानी असायला हवी : सचिव, नवीन आणि अक्षय ऊर्जा
Posted On:
20 JUL 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
सर्वांसाठी परवडणारी, विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करणे हे शाश्वत विकासाचे सातवे उद्दिष्ट साध्य करण्यात विकेंद्रीत अक्षय ऊर्जेची भूमिका काय आहे? भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या चौथ्या आणि अंतिम बैठकीचा एक भाग म्हणून आज गोव्यात आयोजित एका कार्यक्रमात हा प्रश्न विचारण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला म्हणाले:
“सार्वत्रिक ऊर्जा उपलब्धता हा जागतिक ऊर्जा संक्रमणाचा प्रमुख पैलू आहे आणि G20 तो अधोरेखित करत आहे. यासाठी, विकेंद्रित अक्षय ऊर्जा न्याय्य आणि सर्वसमावेशक जागतिक ऊर्जा संक्रमणाच्या केंद्रस्थानी असायला हवी. मात्र, कुणीही एकट्याने काम करू शकत नाही आणि यासाठी सर्व देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. अक्षय ऊर्जेतील मजबूत वाढ आणि विकेंद्रीकृत अक्षय ऊर्जेचा जलद गतीने अवलंब करून भारत स्वच्छ ऊर्जा संक्रमणात आघाडीवर आहे.”
ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषद (CEEW) आणि सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) यांच्या मदतीने नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ऊर्जा उपलब्धतेतील तफावत दूर करण्यासाठी -केंद्रीकृत ग्रिड प्रणालींना पर्याय आणि पूरक म्हणून विकेंद्रित अक्षय उर्जेच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. “आपल्याला जगाच्या ऊर्जेच्या गरजांसाठी दीर्घकालीन उपाय हवे आहेत. विकेंद्रित अक्षय ऊर्जा केवळ घरांनाच नव्हे तर शेती आणि सूक्ष्म उद्योगांनाही ऊर्जा उपलब्ध करून देण्यात मदत करू शकते. तसेच यापुढे परस्परांकडून शिकणे आणि सर्वोत्तम पद्धतींची देवघेव या स्वरूपात जागतिक सहकार्य यश संपादन करण्याचा एक शक्तिशाली आणि परिवर्तनात्मक मार्ग ठरू शकतो,” असे भल्ला यांनी नमूद केले.
“ऊर्जा उपलब्धतेच्या अभावाकडे आणीबाणीची परिस्थिती म्हणून पाहणे आवश्यक असताना, आपण त्या गोष्टीला महत्व देत नाही.”
संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विशेष प्रतिनिधी, आणि युएन ऊर्जा च्या सह-अध्यक्ष दामिलोला ओगुनबी या चर्चासत्राला उपस्थित होत्या. पॅनेल चर्चेमध्ये त्यांनी विकेंद्रित अक्षय ऊर्जा (DRE) तंत्रज्ञानातील गुंतवणुकीच्या महत्त्वावर भर दिला.“ऊर्जा उपलब्धतेच्या अभावाकडे जागतिक स्तरावरची आणीबाणीची परिस्थिती म्हणून पाहणे आवश्यक असताना, आपण त्या गोष्टीला महत्व देत नाही. लोक विकेंद्रित अक्षय ऊर्जेकडे अक्षय ऊर्जा-चलित लाइटबल्ब म्हणून पाहतात, त्याऐवजी ते उत्पादन आणि आर्थिक विकास कसा कसा वाढवेल, आणि जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कसे कमी करेल, हे पाहणे महत्वाचे आहे.”
"2021 मध्ये, 179 दशलक्ष लोकांना विकेंद्रित अक्षय ऊर्जा उपायांद्वारे ऊर्जा उपलब्ध झाली."
नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव दिनेश डी. जगदाळे आपल्या भाषणात म्हणाले, “ऊर्जेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकेंद्रित अक्षय ऊर्जा हा प्रमुख उपाय आहे. त्याचे विकेंद्रित स्वरूप त्याला स्थानिक पातळीवर उपलब्ध अक्षय ऊर्जा साधन संपत्तीचा वापर करण्यासाठी सक्षम करते, आणि निवासी, संस्थात्मक आणि उत्पादनासाठी ऊर्जेच्या गरजेला अनुरूप त्यामध्ये बदल करता येतो.
शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) 7साठी विकेंद्रित अक्षय ऊर्जा (DRE) सर्वोत्तम पद्धती अहवाल प्रकाशित करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय संस्था, उद्योग, वित्त, शैक्षणिक आणि धोरण-निर्मिती या क्षेत्रांमधील तज्ञांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात, ऊर्जा, पर्यावरण आणि जल विषयक परिषदेचा (CEEW) ‘शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) 7 साठी विकेंद्रित अक्षय ऊर्जा (DRE) सर्वोत्तम पद्धतींचे संकलन’ या शीर्षकाचा अहवाल सादर करण्यात आला.
सर्वांसाठी ऊर्जा उपलब्धतेशिवाय न्याय्य आणि सर्वसमावेशक जागतिक ऊर्जा संक्रमण अपुरे आहे. सध्याच्या प्रगतीच्या गतीने, IEA च्या अंदाजानुसार 2030 पर्यंत, म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्टे (IEA, 2022) साध्य करण्याच्या वर्षापर्यंत, ग्लोबल साउथमधील 660 दशलक्ष लोक विजेच्या उपलब्धतेपासून वंचित असतील. विकेंद्रित अक्षय ऊर्जा (DRE) तंत्रज्ञान निवासी, संस्थात्मक आणि उत्पादनाच्या वापरासाठी उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध अक्षय ऊर्जा साधन संपत्तीचा लाभ घेते.
परिषदेचा व्हिडिओ येथे उपलब्ध आहे:
* * *
R.Aghor/Sushma/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941259)
Visitor Counter : 162