विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय बायोफार्मा मिशन, 150 पेक्षा जास्त संस्था आणि 30 एमएसएमईसह एकूण 101 प्रकल्पांना आधार देत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
राष्ट्रीय बायोफार्मा मिशनमुळे रोजगाराच्या संधी वाढल्या असून, या प्रकल्पात 304 शास्त्रज्ञ/संशोधकांसह 1065 मनुष्यबळ कार्यरत आहे
Posted On:
20 JUL 2023 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
राष्ट्रीय बायोफार्मा मिशन, बायोफार्मा (जैव-औषध निर्माण) क्षेत्रातल्या देशभरातील 101 प्रकल्पांना आधार देत असून, त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
या प्रकल्पांमध्ये 304 वैज्ञानिक/संशोधकांसह 1065 मनुष्यबळ कार्यरत असल्याचे ते म्हणाले. हे मिशन उत्पादन विकास बळकट करण्याच्या दृष्टीने, कौशल्यामधील तफावत दूर करण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण देऊन मानवी भांडवल विकासाला देखील सहाय्य करत असल्याचे ते म्हणाले. राज्यसभेत एका लेखी उत्तरामध्ये डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, राष्ट्रीय बायोफार्मा मिशन, शैक्षणिक संस्था, स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसह (एमएसएमई) 150 पेक्षा जास्त संस्थांना मदत करत आहे. परवडणाऱ्या उत्पादनांच्या विकासाकरता, 30 एमएसएमई कंपन्यांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. एमएसएमई कंपन्यांना या मिशन अंतर्गत पुरवण्यात आलेल्या सामायिक सुविधा, क्लिनिकल ट्रायल नेटवर्क आणि तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यालयांचा देखील लाभ मिळाला आहे. राष्ट्रीय बायोफार्मा मिशन (NBM) अंतर्गत उत्पादन विकास, बायोएथिक्स आणि नियामक पैलूंबाबत विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, यामध्ये एमएसएमईंचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
नॅशनल बायोफार्मा मिशन (NBM) हा केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने उद्योग-शैक्षणिक सहकार्य मिशनला, जैव-तंत्रज्ञान संशोधन सहकार्य परिषदेमार्फत (BIRAC) राबवल्या जात असलेल्या जैव-औषध निर्माण प्रकल्पांच्या प्रारंभिक विकासासाठी शोध आणि संशोधनाला गती देण्याचा अधिकार दिला आहे. बायो फार्मास्युटिकल्स (लसी, बायोसिमिलर), वैद्यकीय उपकरणे आणि रोग-निदानामध्ये भारताची तांत्रिक आणि उत्पादन विकास क्षमता मजबूत करणाऱ्या व्यवस्थेची जोपासना करणे आणि त्याला सहाय्य देणे, असा या कार्यक्रमाचा संकल्प आहे.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1941137)
Visitor Counter : 101